बाबा सिद्दीकी हत्येला सरकार जबाबदार, दादांच्या राष्ट्रवादीचा घरचा आहेर

0
52

मुंबई,दि.13 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेवर महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीनं राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यस्थेवरुन सरकारवर टिकेची झोड उठवलेली असताना सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटानंही सरकारला घरचा आहेर दिला आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी गृह मंत्रालय सांभळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाबा सिद्दीकी पक्षाचे वरिष्ठ नेते होते. त्यांना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सुरक्षेची मागणी केली. पण त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही. सिद्दीकी यांची हत्या म्हणजे गृह खात्याचं अपयश असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे. सिद्दीकी यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी जितकी भयंकर आहे, तितकीच ती मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून भयंकर असल्याचं मिटकरी म्हणाले.

एकाच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. त्यातील काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे. बाबा सिद्दीकी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. १५ दिवसांपूर्वी त्यांना धमकी आली होती. त्यानंतर त्यांनी सुरक्षेची मागणी केली. पण सुरक्षा पुरवण्यात न आल्यानं आज ही घटना घडली. तीन आरोपी येतात, सिद्दीकींवर गोळ्या झाडतात ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं जितकी भयंकर आहे, तितकीच ती मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं भयंकर आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीची अशी दिवसाढवळ्या हत्या होणं हे गृह खात्याचं अपयश आहे, अशा शब्दांत मिटकरींनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका केली आहे. ‘आपल्या जीवाला धोका असल्याचं सिद्दीकी यांनी आधीच सांगितलेलं होतं. पण तरीही पोलिसांना त्यांचं संरक्षण करता आलं नाही. ही पोलीस प्रशासनाची मोठी चूक आहे,’ असं खरगे यांनी म्हटलं. महाविकास आघाडीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था संपल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं.