जो कुणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल, त्याचा हिशेब केला जाईल…

0
100

मुंबई,दि. 13 (पीसीबी)
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा चहुबाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान या हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याचे सांगितले गेले. ज्या दोन हल्लेखोरांना काल अटक करण्यात आली, त्यांनीही ते बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पोलीस या पोस्टची तथ्यता तपासत आहेत. हा कुणाचा खोडसाळपणा होता की, बिश्नोई गँगनेच ही पोस्ट केली? याची चौकशी होत आहे.

दरम्यान ज्या अकाऊंटवरून पोस्ट टाकली गेली, तो स्वतःला बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत आहे. मागच्या काही काळात सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत अनुज थापन याला अटक झाली होती. मात्र त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूला बाबा सिद्दीकी जबाबदार असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच बाबा सिद्दीकी सलमान खान आणि दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांची हत्या केली, असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

शुब्बू लोणकर नावाच्या एका फेसबुक अकाऊंटवरून सदर पोस्ट टाकली गेली आहे. हे अकाऊंट फेक आहे की खरे? याचाही तपास केला जात आहे. बिश्नोई गँगकडून याआधीही एखादा गुन्हा केल्यानंतर फेसबुक टाकण्याची कृती गेली आहे. सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्यानंतर अशाच प्रकारे पोस्ट अपलोड करण्यात आली होती.

आता केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओम जय श्री राम, जय भारत, जीवनाचे मोल समजते. शरीर आणि धनाला धूळीसमान मानतो. जे केले ते सत्कर्म होते, मैत्र धर्म पाळला. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भावाला नुकसान पोहोचवले. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक होत आहे, तो एकेकाळी सलमान खानसह मकोका गुन्ह्यात सहभागी होता. अनुज थापन आणि दाऊद इब्राहिमला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडल्यामुळे त्याची हत्या झाली. आमचे कुणाशीही शत्रूत्व नाही. पण जो कुणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल, त्याचा हिशेब केला जाईल.