गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा – संजय राऊत

0
56

मुंबई, दि. १३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली आहे. गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, दिवसा जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत, खंडणीसत्र सुरू आहे. अशा वेळेला राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? तुरुंगात मारामाऱ्या सुरू आहेत, दंगली सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा…
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि आता काय झाले आहेत. आमच्या डोळ्यासमोर त्यांचा अधपतन आम्ही पाहिलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे की, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा. कालची घटना अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी आहे. आमच्यासारच्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे तर पूर्ण संरक्षण काढून घेतले आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. पण, बाबा सिद्दिकी हे तुमच्याच आघाडीत सामील असताना त्यांना सुरक्षा व्यवस्था असताना देखील त्यांना मारण्यात आले. या मागचे कारण भविष्यात समोर येतील. पण, मुंबईत हत्या झाली यावर गृहमंत्र्यांनी नुसते खुलासे करत बसू नये. त्यांना जर याबाबत खंत वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. नाहीतर राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मागावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.

मुंबई पोलिसांच्या नियुक्तीसाठी वर्षा बंगल्यावरून टेंडर निघालंय
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबई हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. तिथे आयपीएस दर्जाच्या पोलिसांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बॅगा उचलणारे, हुजरेगिरी करणारे एकनाथ शिंदे यांचे शुटर म्हणून काम करणाऱ्यांना पोलीस उपायुक्त म्हणून आणण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या नियुक्तीसाठी टेंडर निघाले आहेत. हे टेंडर वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर भरले जातात. या परिस्थितीत जनतेने कायदा, सुव्यवस्था आणि आपल्या जीविताचा रक्षण, याबाबत शाश्वती बाळगणे म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला.

एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम कुठे असतात?
सलमान खान यांच्यासोबत असलेले मैत्री बाबा सिद्दिकी यांना भोवली असावी, असे म्हटले जात आहे. संजय राऊत म्हणाले की. प्रश्न कुठलाही असेल. पण मुंबईत हत्या झाली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. या राज्यात अशाप्रकारे गुंडांची सुद्धा हत्या होता कामा नये. पोलिसांनी अक्षय शिंदेची हत्या केली ना. सिंघम अशावेळी कुठे असतात? एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार होत असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलं आणि स्वतःला सिंघम म्हणून घोषित केला. आता काय राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचा का? असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला आहे.