उधारीचे पैसे मागताच…. गिऱ्हाईकाला राग अनावर, उकळता चहा तोंडावर फेकला

0
109

मुंबई, दि. 11 (पीसीबी) : आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी चहाचा आस्वाद घेतलेला असतोच. पण हाच चहा एका इसमासाठी अत्यंत भयानक ठरला. उकळता चहा अंगावर पडल्याने मुंबईत एक इसम गंभीर जखमी झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो चहा काही अपघाताने सांडला नाही तर तो चक्क चेहऱ्यावर फेकण्यात आला होता. गरम चहामुळे होरपळलेल्या इसावर सध्या उपचार सुरू आहेत. अतिशय क्रूर अशा वागणुकीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मुंबईतील काळाचौकी परिसरात हा अत्यंत क्रूर आणि तितकाच भीषण प्रकार घडला आहे. चहाच्या उधारीचे पैसै मागताच गिऱ्हाईकाचा राग अनावर झाला आणि त्याने चहा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. संतापलेल्या ग्राहकाने चहा टोप उटलून तोच थेट चहा विक्रेत्याच्या तोंडावर मारला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उकळता चहा अंगावर पडल्याने तो विक्रेता भाजला असून टोप जोरात तोंडावर लागल्याने त्याला दुखापतही झाली आहे, असे समजते. दुकानात ग्राहकांची चहा घेण्यासाठी गर्दी होती. त्याचवेळी चहा विक्रेता आणि ग्राहकाचं काही बोलणं सुरू होतं. त्यांच्यात काही वाद झाला आणि अचानक त्या ग्राहकाने समोरचा चहाचा टोप उचलला आणि त्या विक्रेत्याच्या तोंडावर दाणकन मारला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.