रावण दहन कार्यक्रमासाठी आयोजकांनी खबरदारी घ्यावी !

0
72

– नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाकडून आयोजकांसाठी नियमावली जाहीर

– अग्निशामक विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे उत्सव आयोजकांना आवाहन

पिंपरी, दि. 10 (पीसीबी) : पिंपरी – चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये दरवर्षी दसरा (रावण दहन) उत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीकांची व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सदर कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी मंडप/पेंडॉल उभारण्यात येतात. सदर उत्सवाची सांगता सार्वजनिक ठिकाणी लहान-मोठ्या उंचीच्या रावण मुर्तीं उभारुन त्यांचे दहन करण्यात येते. अशा सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उत्सावाच्या आयोजकांनी नागरिक व भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपाययोजना कराव्यात. यासाठी अग्मिशमन विभागाकडून नागरिकांनी अनुसरावयाच्या उपाययोजनांबाबत नियमावली जाहीर केली आहे. सदर नियमावलीचे शहरातील सर्व आयोजक नागरिकांनी पालन करावे. असे आवाहनसुध्दा करण्यात आले आहे.

– अशी आहे नियमावली
१. नवरात्री/दसरा कार्यक्रम आयोजकांकडून “रावण दहन” कार्यक्रमाकरीता “रावण मुर्तीची” उभारणी “ज्वलनशिल प्रकारची भट्टी”, “इलेक्ट्रिक सब स्टेशन”, “पेट्रोल/डिझेल पंप”, “सिएनजी स्टेशन”, “एलपीजी गॅस गोडाऊन”, “हाय टेंशन लाईनच्या खाली”, “रेल्वे लाईनच्या लगत बाजुस” करण्यात येऊ नये.
२. रावण दहन कार्यक्रमाकरीता सदर ठिकाणी उपस्थित असणारी लोकसंख्या लक्षात घेवून आवश्यक रुंदीचे/संख्येचे निकास मार्ग उपलब्ध/खुले ठेवणेत यावे, जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सहज बाहेर पडता येईल.
३. दसरा (रावण दहन) कार्यक्रमाचे ठिकाणी अग्नि दुर्घटना घडलेस, अग्निशमन वाहनांना आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना स्थळी त्वरीत पोहचणेकामी अडथळा निर्माण होईल असे कोणतेही मंडप रस्त्यावर उभे करुन नयेत. तसेच दुर्घटनासमयी अग्निशमन वाहने, उभारलेल्या मंडपापर्यंत/रावण मुर्तीजवळ पोहोचू शकतील यासाठी रस्ता किमान ६ मीटर रुंदीचा कायमस्वरुपी खुला/उपलब्ध ठेवावेत.
४. रावण दहन कार्यक्रमानिमित्त मंडपात केलेली कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई, बल्ब, ट्यूबलाईट इ.चा संपर्क मंडपातील सजावटीच्या ज्वलनशिल साहित्यास होवू नये अशा पद्धतीने लावणेत यावे. तसेच अधिक उष्णता निर्माण करणारे हॅलोजन बल्ब/ फोकसचा वापर टाळून त्या ठिकाणी LED दिव्यांचा उपयोग करावा.
५. दसरा (रावण दहन) उत्सवाचे ठिकाणी आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी व्यवस्थापनाकडून उत्सवाच्या संपुर्ण कालावधीत अग्निशमन यंत्रांचा वापर करता येणारे जाणकार तथा प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास तैनात ठेवणेत यावेत.
६. दसरा (रावण दहन) निमित्त सदर ठिकाणी येणाऱ्या भाविक/नागरीकांना माहिती देण्यासाठी, नागरीकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी आयोजन समितीमार्फत समन्वयकांची नियुक्ती करणेत यावी.
७. दसरा (रावण दहन) कार्यक्रमाचे ठिकाणी अग्निसुरक्षिततेच्या दृष्टिने ड्रम/टब/बकेट इ. मध्ये पाणी भरुन ठेवणेची व्यवस्था करणेत यावी.
८. आयोजकांद्वारे प्रत्येकी १०० चौ.मी. परिसराचा विचार करता, दसरा (रावण दहन) कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत त्यांच्या मंडपात “एबीसी टाईप ६ कि.ग्रॅम क्षमतेचे २ नग, सीओटू ४.५ कि.ग्रॅम क्षमतेचे २ नग” अग्निशमन यंत्रणा तसेच मंडपाच्या आवारात पाण्याने भरलेला ड्रम व वाळूने भरलेल्या २ बादल्या उपलब्ध करुन द्याव्यात.
९. रावण दहन कार्यक्रमाकरीता उभारण्यात आलेल्या रावणाच्या मुर्तीची एकत्रीत उंची लक्षात घेवून, सुरक्षिततेच्या दृष्टिने मुर्तीच्या बाजुने उभारण्यात येणारे बेरीकेटींगचे अंतर मुर्तीच्या उंचीच्या अंतरापेक्षा किमान १०० मिटर अधिक असणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसर मनुष्य विरहित परिसर म्हणून घोषित करणेत यावे.

– आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी इथे साधावा संपर्क
कार्यक्रमस्थळी कोणत्याही प्रकारे अग्नि दुर्घटना घडल्यास अग्निशमन विभागाचा टोल फ्री नं. १०१ किंवा अग्निशमन नियंत्रण कक्ष मोबाईल क्र. ७०३०९०८९९१, ८४८४०८११०१, ८४८४०८२१०१ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा व त्याचबरोबर, अग्निशमन पथकाने दिलेल्या सूचनांचे नवरात्री उत्सव/दसरा (रावण दहन) आयोजकांनी काटेकोर पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांनी सर्व आघाड्यांवर खबरदारी घ्यावी!
शहरात विविध उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येतात. नागरिकांना सर्व उत्सव साजरे करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने उत्सव आयोजकांना विविध बाबींची खबरदारी घेण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांच्या सेवेसाठी व सुरक्षिततेसाठी महापालिका सदैव तत्पर आहेच. परंतू आयोजकांनी जाहीर केलेल्या नियमावलींचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांनी नियमावलीतील सर्व घटकांची पूर्तता करावी!

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विविध उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांना देण्यात आलेल्या नियमावलीमधील सर्व घटकांची पूर्तता करावी. नागरिकांच्या हितासाठी महापालिकेने आयोजकांना नियमावली दिली असून उत्सव काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.
– प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (1), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

उत्सव आयोजकांनी सुचनांचे काटेकोर पालन करुन त्यांची अंमलबजावणी करावी!
नवरात्र उत्सव/दसरा (रावण दहन) उत्सव कालावधीमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदर सूचना केवळ अग्निसुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. नवरात्र उत्सव/दसरा (रावण दहन) आयोजकांनी अग्निशमन विभागाव्यतिरिक्त पोलीस विभाग, वाहतूक विभाग, महापालिकेच्या इतर विभागांची आवश्यक ती परवानगी घेऊन सुचनांचे काटेकोर पालन करुन त्याची अंमलबजावणी करावी.
– मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशामक विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका