संभाजी ब्रिगेडचा दणका; बिलासाठी डांबून ठेवलेल्या रुग्णाची अखेर सुटका!

0
55

थेरगाव, दि. 10 (पीसीबी) : बिल भरले नाही म्हणून थेरगाव मधील एका खासगी हॉस्पिटलने रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पीडित रुग्णाच्या नातेवाईकांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्याकडे धाव घेतली.यावेळी रुग्णालय प्रशासनाला संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तब्बल २४ तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,एका व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्याच्या नातेवाईकांनी थेरगाव मधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये मंगळवारी ऍडमिट केले होते. हॉस्पिटल प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे पेशंटच्या नातेवाईकांनी एक लाख रू.जमा केले. तद्नंतर पेशंटची एनजीओप्लास्टी करण्यात आली.एनजीओप्लास्टी झाल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर हॉस्पिटलने रुग्णाच्या नातेवाईकांना पेशंटचे बिल दोन लाख ऐंशी हजार रुपये भरण्याचे सांगितले.त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पन्नास हजार रुपये भरले व शासनाच्या १०% आर्थिक दुर्बल घटकातून उर्वरित रक्कम माफ करुन पेशंटला सोडण्याची विनंती केली.परंतु हॉस्पिटलने पैसे भरल्याशिवाय पेशंटला सोडताच येणार नसल्याचे सांगितले.यासंदर्भात पेशंटचे नातेवाईक हे शहरातील विविध नगरसेवक तसेच आमदार खासदार यांना घडलेली परिस्थिती सांगत सहकार्य करण्याची विनंती करत होते. परंतु कुठेही मदत न मिळाल्याने अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी शहरातील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांना संपर्क साधत घडलेली संपूर्ण परिस्थिती सांगितली.नंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे जात पेशंटला डिस्चार्ज देण्याची विनंती केली परंतु हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी संभाजी ब्रिगेडच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडला.त्यानंतर वाकड पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.पोलिसांनी हॉस्पिटलचे व्यवस्थापक आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांची चर्चा घडवून आणल्यानंतर सोमवार (दि.७) रोजी डिस्चार्ज करू असे हॉस्पिटलने आश्वासन दिले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी बिर्ला हॉस्पिटल तसेच पोलीस प्रशासन यांना लेखी पत्र देऊन सोमवार दि.७ तारखेला हॉस्पिटल समोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता सोमवारी सकाळी ११ वाजता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यासाठी जमले असताना बिर्ला हॉस्पिटलच्या प्रशासनाने नमती भूमिका घेत पाच दिवसांपासून बिलाच्या संदर्भात थांबवून ठेवलेल्या पेशंटचा डिस्चार्ज केला.

त्यानंतर संभाजी ब्रिगेडने धरणे आंदोलन करण्याचे स्थगित केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे,रुग्णसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र चव्हाण,अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दिकभाई शेख,छावा संघटनेचे प्रदेश महासचिव सचिन भिसे,शहराध्यक्ष विलास पाटील,महिला आघाडीच्या शितल मोरे,वेल्फेअर पार्टीचे शहर अध्यक्ष सालार शेख,संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष मुकेश बोबडे सचिव शशिकांत औटे सहसचिव वसंत पाटिल,सामाजिक कार्यकर्ते विशाल मिठे,किरण जाधव,दत्ता मिठे,संजय भांदिगरे,योगेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले.