रतना टाटांचा विश्वासू सहाय्यक शंतनू नायडूला मोठा धक्का

0
41

मुंबई, दि. १० : रतन टाटा यांचं बुधवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचा विश्वासू सहाय्यक शंतनू नायडूला त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीनंतर माझ्यासोबत एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरुन काढण्यात माझं अख्खं आयुष्य जाइल, असं तो म्हणाला होता. तसेच, त्याने रतन टाटांसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. ज्यामध्ये या दोघांची मैत्री किती घट्ट होती हे दिसत होतं. आता टाटांच्या अखेरच्या प्रवासातही त्यांच्या या मित्राने त्यांची साथ सोडलेली नाही.

गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कुलाबा येथील निवासस्थानाहूत रतन टाटा यांचं पार्थिव मुंबईतील एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. यावेळी, फुलांनी सजवलेल्या गाडीतून टाटा यांचं पार्थिव कुलाबा ते मरिन ड्राइव्ह येथे नेण्यात आलं. तेव्हा शंतनू नायडूही त्यांच्यासोबत होता.
ज्या गाडीत रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं, त्या गाडीपुढे शंतनू आपल्या बाईकवर दिसला. गाडी पुढे जाण्यास कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शंतनू रस्ता मोकळा करताना दिसला. यावेळी शंतनूच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या मनातील दु:ख सांगून गेले. त्याचा हा व्हिडिओ पाहून सारेच हळहळले. सध्या शंतनूच्या मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.