धनेश्वर मंदिर गोशाळा भूमिपूजन सोहळ्यात प्रचार जगतापांचा, नारळ फुटला भाऊसाहेब भोईर यांचा

0
158

चिंचवड, दि. 09 (पीसीबी) : चिंचवडगाव येथील पूरातन धनेश्वर महादेव मंदिरात गोशाळेच्या जिर्णोध्दारासाठी आमदार निधीतून ४० लाखाचा निधी अश्विनी जगताप यांनी दिला. या निमित्ताने नियोजित विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर समिती आणि गावकऱ्यांतर्फे आयोजित या सोहळ्यात भाजपचे संभाव्य उमेदवार शंकरशेठ जगताप यांच्या प्रचाराचा खटाटोप होता, प्रत्यक्षात तिथे शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्याच प्रचाराचा नारळ फुटला. चिंचवडची युवाशक्ती तसेच तमाम गावकी भावकी भोईर यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे दर्शन सर्वांना झाल्याने जगताप कुटुंबियसुध्दा थोडे चपापले.

पवना नदिच्या किनाऱ्यावर तमाम चिंचवडकरांचे श्रध्दास्थान असलेल्या धनेश्वर महादेव मंदिर आवारात प्रशस्थ गोशाळा आहे. या गोशाळेच्या विस्तारासाठी निधी कमी पडत होता. मंदिराशेजारी उद्यान आणि गोशाळेचा विस्तार असा हा प्रकल्प आहे. या कामाला कोटींवर खर्च अपेक्षित आहे. मदत म्हणून चिंचवडमधून भाजपकडून विधानसभेची उमेदवारी करू पाहणाऱ्या शंकरशेठने दानशूरपणा दाखवला. भावजयी अश्विनीताईंच्या आमदार निधीतून ४० लाख रुपये मंजूर केले आणि व्यक्तीगत मदतीचे आश्वासन दिले. सर्वात मोठा निधी मिळाला म्हणून मंदिर समितीने आमदार अश्विनीताई आणि शंकरशेठ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा सोमवारी सायंकाळी आयोजित केला होता.

चिंचवडगाव पंचक्रोशितले दोन अडिचशे गावकी म्हणजेच कारभारी मंडळी उपस्थित होते. त्यात चिंचवडे, भोईर, गावडे, गोलांडे, आहेर, वाल्हेकर, शेडगे, शिवले, भालके, निंबाळकर, पडवळ, मिरजकर, सायकर, वर्मा हजर होते. आजी-माजी नगरसेवकांपैकी भाऊसाहेब भोईर, शाम वाल्हेकर, मधूकर चिंचवडे, हनुमंत गावडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, हरि तिकोणे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, करुणा चिंचवडे अवर्जून उपस्थित होते.

अत्यंत पवित्र अशा या महादेव मंदिरातील हा पहिलाच असा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. शंकरशेठ आणि आमदार अश्विनीताई यांचीही समयोचित भाषणे झाली. उपस्थितांपैकी हभप मोरे महाराज आणि भाऊसाहेब भोईर यांना बोलण्याची संधी मिळायला पाहिजे होती, अशी चर्चा झाली. भाषण झाले नाही पण, भोईर यांच्याकडे आभारप्रदर्शन करण्याची जबाबदारी आली.
भोईर यांनी आपल्या आभार प्रदर्शनात जगताप कुटुंबियांच्या दात्त्वृत्वाचा आणि सहकार्याचा यथोचित गौरव केला आणि गावकऱ्यांच्यावतीने ऋण व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी एक खंत व्यक्त केली आणि तिथेच सोहळ्याचा सगळाच नूर पालटला. भोईर म्हणाले, आजचा सोहळा संस्मरणीय आहे पण, एक खंत वाटते. धार्मिक कार्य म्हणून सिध्दिविनायक ग्रुपचे राजूशेठ सांकला यांच्यामदतीने आम्ही २० लाख रुपये खर्च करून २००८ मध्ये मंदिराच्या समोर सभामंडपाचे काम केले. आज विचार केला तर ते कोटींच्या पुढचे काम होते. आम्ही कुठेही त्याचा गवगवा केला नाही. मात्र, त्यावेळी असाच सोहळा झाला असता तर खूप बरे वाटले असते. आम्ही केलेली मदत ही देवासाठी होती, त्याचा राजकारणासाठी उपयोग नाही केला. दरम्यान, भोईर यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तरुणाईने शिट्ट्या वाजवत भोईर यांना प्रतिसाद दिला. भोईर यांचा शालजोडितला टोला अचूक नेम साधून गेला. तमाम गावकी यावेळी अपक्ष उमेदवार असले तरी भोईर यांच्यामागे ठामपणे उभी असल्याचे दर्शन झाले. भोईर यांनी आभार प्रदर्शन करता करता जे भाषण केले त्यात त्यांच्याच प्रचाराचा नारळ फुटला. भाषणात भोईर यांनी अचूक संधी साधली आणि म्हणाले, आपली ही मोरया गोसावींची भूमी आहे. चापेकरांची क्रांती इथेच झाली. याच धनेश्वर मंदिरात चापेकर बंधुंनी रॅन्ड वधाची शपथ घेतली होती. आता इथेच क्रांती होणार.

दरम्यान, या सोहळ्यासाठी दोन स्वतंत्र निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. पहिल्या पत्रिकेत लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून धनेश्वर गोशाळा ट्रस्टच्या वतीने, चिंचवडगाव येथील धनेश्वर महादेव मंदिर परिसरात उभारल्या जाणाऱ्या ‘आधुनिक गोठ्या’च्या प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले असे म्हटले होते. निमंत्रक गोशाळा ट्रस्ट आणि समस्त चिंचवडगाव ग्रामस्थ असा उल्लेख आहे.
दुसऱ्या निमंत्रणात, आमदार निधीतून उद्यान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा, असे म्हटले होते. पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व भाजप नेत्यांचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि जगताप कुटुंबियांचा फोटो होता. निमंत्रक म्हणून भारतीय जनता पार्टी असे या निमंत्रणात खाली उल्लेख आहे. हा निवडणूक प्रचाराचा भाग असल्याने अनेक गावकऱ्यांचा नेमका त्यालाच आक्षेप होता.