हरियाणाचा निकाल महाविकास आघाडिसाठी धोक्याची घंटा

0
62

हरियाणा, दि. 08 (पीसीबी) : सर्व परिस्थिती विरोधात असतानाही हरियाणात पुन्हा भाजपची सत्ता स्थापन करणाऱा निवडणूक निकाल हा आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडिच्या नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे. फक्त जाट समाजच नाही तर अन्य समाज घटकांना समान संधी देत, कुठलाही बोभाटा न करता भाजपने रा.स्व.संघाच्या मदतीने व्युहरचना तयार केली होती, ती फळाला आली. निकालाने आता महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मनोधैर्य वाढल्याने महाविकास आघाडिला महाराष्ट्राची लढाई वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. आता महाविकास आघाडिला प्रत्येक उमेदवार देताना अभ्यासू, सक्षम, लोकाभिमूख आणि निवडूण येण्याची क्षमता पाहूनच तोडिस तोड असे उमेदवार द्यावे लागणार आहेत.
हरियाणा निवडणुकिसाठी निवडणूक पूर्व अंदाज व्यक्त करणाऱ्या सर्व कंपन्यांचे सर्वेक्षण तद्दन खोटे निघाले. हरियाणात भाजपचा दारुण पराभव होईल आणि काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल हा निष्कर्ष फसला. नामांकित कंपन्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या बरोबर उलट निकाल लागला आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकिबाबत विविध सर्वेक्षणांत आलेले अंदाज आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपची महायुती पराभूत होईल आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस मिळून जी महाविकास आघाडी सत्तेत येईल, हा अंदाज आता तथ्यहिन वाटू लागला आहे.
हरियाणा राज्यात शेतकरी आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात देशात वातावरण झाले होते. महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाट आणि सहकाऱ्यांनी भाजपचे खासदार ब्रजभुषण सिंह यांच्या छळाला कंटाळून केलेले आंदोलन केंद्राने दुर्लक्षित केले होते. त्याचा परिणा होऊन संपूर्ण जाट समाज भाजप विरोधात उभा राहिल हा अंदाजसुध्दा खोटा ठरला आहे. अर्थात विनेश फोगाट ही काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी झाली, मात्र काँग्रेस पक्ष हारला आहे.
भाजपने विरोधातील सर्व वातावरणाचा बारीक अभ्यास केला आणि अगदी पध्दतशीर उपाययोजना केली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बदलून मागास समाजातील नेत्याला संधी दिली आणि अर्धे काम फत्ते केले. उमेदवारी देताना वारंवार निवडणूक लढविलेल्या चेहऱ्यांना बाजुला केले आणि ५० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली. जाट समाज भाजपच्या विरोधात गेल्याने जाट इतर सर्व समाज घटकांना जवळ करून त्यांची गठ्ठा मते भाजपने मिळवली आणि विजयाचे गणित साध्य केले. सर्व डॅमेज कंट्रोलसाठी भाजपने ताबडतोब उपाययोजना केल्या मात्र, दुसरीकडे काँग्रेस सर्वेक्षण आणि निवडणूक पूर्व अंदाजात रमल्याने त्यांची फसगत झाली.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकिला महाविकास आघाडिने एकास एक असे तगडे उमेदवार सर्व ठिकाणी दिल्याने भाजपच्या खासदारांची संख्या नऊ पर्यंत खाली आली आणि महाविकास आघीडी ३१ पर्यंत पोहचली. आता विधानसभेलाही तोच ट्रेंड राहिल अशा धुंदीत महाविकास आघाडी आहे. हरियाणाच्या निकालाने महाविकास आघाडिला धोक्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासारखे राज्य कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ द्यायचे नाही, असा मोदी-शाह आणि संघ भाजपचा आहे. त्यासाठी बूथ पातळीपर्यंतची यंत्रणा कार्यरत आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडित जागा वाटपावर मारामाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण, उध्दव ठाकरे, सुप्रिया सुळे की नाना पटोले यावर आताच धुसफूस सुरू आहे. हरियाणाच्या निकालातून महाविकास आघाडीने धडा घेतला नाही तर पुन्हा महायुती आरामात सत्तेत येईल, हाच संदेश आहे.