आगीत गोदाम जळून खाक

0
101

चिखली, दि. 08 (पीसीबी) : मोशी रोड चिखली येथे फाईन वजन काट्याजवळ असणाऱ्या भंगार मालाच्या गोडाऊनसह चार दुकानांना सोमवारी (दि. 7) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी चिखली रस्त्यावर असणाऱ्या भंगारमालाच्या गोडाऊनला आग लागल्याबाबत सोमवारी दुपारी अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्राला माहिती मिळाली. माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिखली, तळवडे, प्राधिकरण, पिंपरी, थेरगाव, मोशी , भोसरी अग्निशमन केंद्राची 11 वाहने घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आली. दरम्यान घटनास्थळी अमित स्क्रॅप सेंटर, एस आर कुल सेंटर, मोहम्मद स्टील सेंटर, एस के स्क्रॅप सेंटर या चारही भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागल्याचे निदर्शनास आले.

गोडाऊन मध्ये रबर प्लास्टिक व इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाकडून अकरा अग्निशमन वाहनाद्वारे व 59 कर्मचारी वर्गाकडून दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.