आमदार बनसोडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच कडवा विरोध

0
139

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांनी सोडून दुसरे कोणालाही उमेदवारी द्या, अशी रोखठोक मागणी बारामती येथे निमंत्रीत करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ४० वर माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

आमदार बनसोडे हे कोणालाही उपलब्ध नसतात, त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांत आणि मतदारांतही तीव्र नाराजीचा सूर आहे तसेच दहा वर्षांत त्यांचे एकही काम दिसत नसल्याने यावेळी त्यांना संधी दिलीच तर पराभव वाट्याला येईल, अशी भीती माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांनी व्यक्त केली. दुसरे माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी त्या मागणीला पाठिंबा दिला. उपस्थित बहुसंख्य नेत्यांनी त्या मताशी सहमती दाखविल्याने आता आमदार बनसोडे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

दरम्यान, अजितदादा पवार यांनी या विषयावर बोलताना अद्याप जागा वाटपाची चर्चा बाकी आहे. पुढचे तीन दिवस त्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसणार आहेत. आणखी काही प्रभावी इच्छुक आपल्याला भेटून गेलेत असेही अजितदादांनी स्पष्ट केले. समोर महाआघाडी कोणाला उमेदवारी देणार ते पाहून नंतर या जागेबाबत उमेदवारीचा निर्णय करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.