वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावेळी राडा ; भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

0
77

रत्नागिरी, दि. 07 (पीसीबी) : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज मोठा राडा झालेला बघायला मिळाला. सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवले. रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा आणि भाजपचा तीव्र विरोध होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांना आंदोलकांची गर्दी बघून कार्यक्रम उरकावा लागला. उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले, त्यावेळी देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी रत्नागिरीत मोठा गोंधळ बघायला मिळला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पण भाजप आणि सकल हिंदू समाजाचा या कार्यक्रमास विरोध आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून या विरोधात निदर्शने दिली. यावेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनादेखील काळे झेंडे दाखवले. उदय सामंत आले त्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. वक्फ बोर्डाचं कार्यालय रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली.

सकल हिंदू समाजाच्या आंदोलकांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “आमचं एकच म्हणणं आहे की, वक्फ बोर्डाने भारत मातेचं आणि हिंदू समाजाच्या जमिनी आजपर्यंत ताब्यात घेतल्या आहेत. हे वक्फ बोर्ड विधेयक 8 मार्च 2024 ला प्रलंबित असताना देखील रत्नागिरी सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये वक्फ बोर्डाचं कार्यालय आणणं त्यामुळे हिंदू समाजाचा त्यास जाहीर निषेध आहे. आम्हाला प्रशासनाने आंदोलनाचा अधिकारही दिला आहे”, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.