अजितदादांना आता दुसरा मोठा धक्का, जे इंदापुरात तेच १४ तारखेला फलटणला

0
65

इंदापूर, दि. 07 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीत नवीन पक्ष आणि चिन्हासह लढूनही राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या शरद पवारांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी एकापाठोपाठ एक डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. आधी कोल्हापूर, मग इंदापूर, यानंतर आता साताऱ्यात शरद पवार मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. याचे संकेत दस्तुरखुद्द शरद पवारांनी दिले आहेत. इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी जोरदार बँटिंग केली. त्यावेळी पवारांनी पुढील पक्षप्रवेशाचे संकेत दिले.

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी देत पवारांनी भाजपसह अजित पवारांना एकाचवेळी धक्का दिला. पाटील यांच्या रुपात पवारांना इंदापुरात तगडा उमेदवार मिळाला आहे. इथे सध्या अजित पवार गटाचे दत्ता भरणे आमदार आहेत. त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांनी फिल्डींग लावली आहे. यानंतर आता पवारांनी साताऱ्यात करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी सुरु केली आहे.

इंदापुरात पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी १४ ऑक्टोबरला एका ठिकाणाहून बोलावणं आल्याचं सांगितलं. ‘आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला कुठून काही फोन आला आणि त्यांनी हट्ट केला, यावेळी इंदापुरला चालला आहात. १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. म्हटलं काय कार्यक्रम आहे? तर म्हणे, इंदापुरला आहे तोच आमच्याकडे आहे. विचारलं कुठे? तर म्हणे फलटणला! समजलं का?,’ असा किस्सा पवारांनी भरसभेत कथन केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘तर आता याच्यानंतर फलटण. जवळपास १ महिन्यातले सगळे दिवस बुक झालेत,’ असं म्हणत पवारांनी येत्या महिन्याभरात पक्षात बरंच इन्कमिंग होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले