भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटीलांनी हाती घेतली तुतारी, हजारो कार्यकर्त्यांसोबत शरद पवार गटात प्रवेश

0
59

पुणे, दि. 07 (पीसीबी) : भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश करुन तुतारी हातात घेतली आहे. आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित आहेत. आज हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलाच दणका बसणार आहे. ”गेल्या २ महिन्यांपासून मी इंदापुरात फिरतोय. लोकांशी बोलतोय. तुम्ही विधानसभा लढायला हवी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांची भावना मी भाजपमधील नेत्यांपर्यंत पोहोचवली,’ असं म्हणत हर्षवर्धव पाटील यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्यांचं त्यांनी सांगितलं.

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राज्यातील सर्वात मोठा दूध प्रक्रियेचा ब्रँड असलेल्या सोनाईचे संचालक प्रवीण माने ॲक्शन मोडवर आले आहेत. दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. इंदापूर विधानसभा उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करू, असं त्यांनी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मेळावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्यास काही नेत्यांनी विरोध केला आहे. या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हणाल्या होत्या की, ”हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काही नेते नाराज झाले आहेत. हे सहाजिकच आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना आम्ही जेष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. त्यांची समजूत काढण्याची आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही ते करू. पवार आणि पाटील यांचे अनेक दशकांचे संबंध आहेत. ते आमच्याकडे येत आहेत. याचा आनंदच आहे”.