बिग बॉस मराठी जिंकताच सूरज चव्हाण यांचं नशिब उजाडलं

0
53

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : रिल्सस्टार सूरज चव्हाण बिग बॉस सीझन पाचचा विजेता ठरला आहे. आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करुन दाखवण्याची जिद्द राहिली तर आपल्याला यश हे नक्की मिळतं. कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल, बऱ्याचदा हुलकावणी देत असेल, किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चिकरण होत असेल की आता नको आणि परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल, पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो, आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरश: लोटांगण घालतं. प्रसिद्ध लेखक पाउलो कोएलो यांच ‘द अल्केमिस्ट’ हे पुस्तक आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवते. आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण जिद्दीने प्रयत्न केला तर संपूर्ण जग आपल्याला ते मिळवण्यासाठी मदत करतं. फक्त आपण डगमगायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत काम करत राहायचं. आपण यशस्वी व्हावेत यासाठी अनेक हाथ आपल्या मदतीसाठी पुढे येतात. फक्त त्या हाथांना आपण काम करतांना दिसायला हवं.

बिग बॉस सीझन 5 जिंकणार सूरज चव्हाण याची कहाणी त्यापेक्षा वेगळी नाहीच. बिग बॉसच्या घरात रिल्सस्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण आता यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून भरपूर बाकी आहे. पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं नशिब उजाडलं आहे.

बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे.

सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत. पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं आणखी एक बक्षीस त्याला मिळालं आहे. ते बक्षीस म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली घोषणा. केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे. त्यांच्या प्रयत्नांच्या पंखांना आणखी बळ मिळणार आहे.

याआधी गायक उत्कर्ष शिंदे याने सूरज चव्हाणला गिफ्ट म्हणून एक मोठी घोषणा केली होती. शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल. त्या गाण्यात सूरज हा नृत्य आणि अभिनय करेल, अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती. त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली.