रेड झोन हटविण्याच्या घोषणेचे दहा वर्षांत काय झाले…

0
140

– आमदार लांडगे यांना जाब विचारणाऱ्या फलकांमुळे मोठी खळबळ
भोसरी, दि. ३ –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या दहा वर्षांच्या कारभाराचा पंचनामा कऱण्यात आला आहे. ‘१० वर्षे पोकळ जाहिरातबाजीची…, `१० वर्षे प्रतीक्षा ‘रेड झोन’ हटविण्याची…, १० वर्षे प्रतीक्षा हक्काच्या पाण्याची…, १० वर्षे समाविष्ट गावांच्या अधोगतीची…, `१० वर्षे इतरांच्या कामांचे श्रेय लाटण्याची…`आदी फलकांनी भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांना जाब विचारण्यात आला आहे. अत्यंत मार्मिक शब्दांत वर्मी घाव बसेल असे लोकांच्याच मनातील महत्वाच्या प्रश्नांवर खोटी आश्वासने किती दिली त्याचे वाभाडे काढण्यात आलेत. सर्वांच्या शेवटी आता वेळ आली आहे… बदल घडवण्याची।’ अशा आशयाचे फलक संपूर्ण मतदारसंघात लागल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार लांडगे हे २०१४ पासून सलग दहा वर्षे भोसरी विधानसभेचे आमदार आहेत, पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर लढले आणि जिंकले. दोन्ही निवडणुकांवेळी आमदार लांडगे यांनी मतदारसंघातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. जनतेला ‘व्हिजन २०२०’चे स्वप्न दाखविले होते. यामधील विविध विकासकामे प्रलंबित आहेत. तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असताना आमदार लांडगे यांच्याविरोधात मोठी नाराजी पसरली असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना होण्याची शक्यता आहे.
दिघी, चऱ्होली, तळवडे, मोशी, चिखली या भागांतील विविध प्रलंबित प्रश्नांवर या फलकांतून भाष्य केले आहे. त्यामुळे या भागातील जनतेमध्ये आमदार लांडगे यांच्याबद्दल किती प्रचंड नाराजी आहे याचे प्रत्यंतर मिळते. याच नाराजीतून संपूर्ण मतदारसंघात आमदार लांडगे यांच्या १० वर्षांच्या कारभाराची चिरफाड करणारे हे फलक भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
जाहिरातफलक रातोरात काढण्याचा प्रयत्न –
मतदारसंघातील विविध भागांत आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात जोरदार फलक लावून त्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, हे जाहिरातफलक काढून घेण्यासाठी आमदारांच्या माणसांनी महापालिकेतील आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणला होता. पोलिसांनीही त्यात मदत केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. रातोरात हे जाहिरात फलक हटवण्याचे काम अगदी पोलिस बंदोबस्तात आमदारांचेच कार्यकर्ते करत होते. सामाजिक शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचा कांगावा महेश लांडगे यांच्या समर्थकांनी केला होता. पोलिसांनी सर्व फलकांचा मजकूर आणि परवानगी पाहिल्यावर कुठेही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे आढळले. अजित गव्हाणे यांच्या समर्थकांनी त्यासाठी महापालिकेकडून आका चिन्ह विभागाची रितसर परवानगी घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व चौकाचौकांत नव्या दमाने हे फलक लावण्यात आल्याने आमदार लांडगे निरुत्तर झाल्याचे पहायला मिळाले.