दसऱ्यापूर्वीच आचारसंहिता लागू होणार

0
82

मुंबई, दि. ०३ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर तसेच हरियाणा राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यावर कधीही लागू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या मेळाव्यावर बंधने यावीत यासाठी राज्यात चार दिवस आधीच म्हणजे दसऱ्यापूर्वीच आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका-
दसऱ्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने सरकारदरबाही देखील निधी मंजुरी आणि कामांच्या घोषणा करण्याची घाई दिसून येत आहे. राज्य सरकारने एकाच आठवड्यात दोनवेळा मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

ठाकरेंची शिवाजी पार्कवर, तर शिंदेंची बीकेसी मैदानावर तोफ धडाडणार-
पुढील काही दिवसात शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून दोन्ही मैदानाची पाहणी केली जाणार आहे आणि अंतिम जागा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळत असून बीकेसी मैदान अंतिम होण्याची शक्यता जास्त आहे. कारण याच ठिकाणी आधी देखील शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी, महायुतीनंतर तिसरी आघाडीही मैदानात-
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.