मुकेश अंबानी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ वर ठाकरेंच्या भेटीला

0
56

मुंबई, दि. ०२ (पीसीबी) : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जात अंबानी पितापुत्रांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांची अंबानींनी भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंबानींनी नेमकी काय आणि कोणत्या विषयावर चर्चा केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भेटी-गाठींचा सिलसिला
मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुकेश अंबानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या बैठकीला ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजसही उपस्थित असल्याची माहिती आहे.

मातोश्रीनंतर वर्षावर बैठका
त्यानंतर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अंबानी पितापुत्र ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. तिथेही तासभर त्यांच्या बैठका झाल्या. या दोन्ही भेटीगाठींमागील नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे व्यावसायिक कारण आहे, कुठल्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा सोहळ्याचं निमंत्रण आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सिलसिला पार पडला, हे स्पष्ट झालेलं नाही.

राऊत-नड्डा आणि ठाकरे-फडणवीस भेटीगाठींचा दावा
याआधी, शिवसेना खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओतून केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच आणखी एका भेटीगाठीचा प्रकार समोर आला आहे