सत्य, अहिंसा अन् शांतीचा निर्मळ झरा म्हणजे महात्मा गांधी

0
39

पिंपरी, दि. ०२ (पीसीबी) : दिलासा संस्था व मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे बुधवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘मी महात्मा गांधी बोलतोय!’ हे लक्षवेधी पथनाट्य सादर करण्यात आले. ८४ वर्षांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. पी. एस. आगरवाल यांनी महात्मा गांधी यांची हुबेहूब भूमिका साकारली होती. मानवी हक्क आणि संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, संगीता जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे सदस्य कवी शामराव सरकाळे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी पथनाट्यात सहभाग घेतला होता. सुभाष चव्हाण यांनी “तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा…” हे गीत म्हणत पथनाट्याला सुरुवात केली.

सत्य, अहिंसा, शांती, मानवता, धर्मनिरपेक्षता, स्वावलंबन, स्वदेशी वस्तूंचा वापर, स्वच्छ्ता या महात्मा गांधी यांच्या जीवनमूल्यांचा जागर या पथनाट्यातून करण्यात आला. या प्रसंगी ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, कवी बाळकृष्ण अमृतकर, राधाबाई वाघमारे, फुलवती जगताप, तुळशीराम जगदाळे, गजानन धाराशीवकर, विजय पेंडे, राहुल जाधव, मारुती कांबळे, सागर नगोलकर, सुनंदा तामचीकर, सागर पाटील, शुभम बेंद्रे, दीपक चोरे, समाधान कांबळे, निकेश सरोदे, राहुल चव्हाण उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत तानाजी एकोंडे यावेळी म्हणाले की, “पथनाट्य म्हणजे समाजाला डोळस बनविण्याची एक थेट प्रक्रिया असते. सत्य, अहिंसा परमोधर्म म्हणून जगाला प्रेम देणाऱ्या गांधींचे विचार आजच्या काळाला उपयुक्त आहेत. अर्थात, महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नसून ती श्रेष्ठ विचारप्रणाली आहे. त्याचे चिंतन करणे गरजेचे आहे. आजच्या समाज व्यवस्थेला महात्मा गांधी यांची जीवनमूल्ये जगण्याची प्रेरणा अशा उपक्रमातून नक्कीच मिळेल!” महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील डॉ. पी. एस. आगरवाल यांनी ‘मी महात्मा गांधी बोलतोय…’ यावर सुंदर विचार व्यक्त केले ते म्हणाले, “आजचे युग मला विसरत चालले आहे. सत्य अन् अहिंसा ही मूल्ये काळाच्या ओघात विरत चालली आहेत; परंतु हीच जीवनमूल्ये माणसांनी जपली पाहिजेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार दूर सारून अखंड जीवमात्रांवर प्रेम केले पाहिजे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान देशभक्तांचे कायम स्मरण करून आपल्या देशासाठी जे जे उत्तम करता येईल ते ते केले पाहिजे. “खेड्याकडे चला. ग्रामजागर करा. स्वावलंबनाची कास धरा. जाती, धर्म, वर्ण, भेद मिटवा. समर्पित भाव ठेवून नि:स्वार्थ देशसेवा करा!” असा बहुमूल्य संदेश महात्मा गांधी बनलेल्या डॉ. पी. एस. आगरवाल यांनी दिला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी आभार मानले. सामुदायिक वंदे मातरम् म्हणून या पथनाट्याची सांगता करण्यात आली. जमलेल्या सर्वांनी वंदे मातरम् घोष केला.