अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

0
99

अल्पसंख्याकांना समन्यायी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत आहोत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उदगीर येथे जनसन्मान यात्रेदरम्यान वक्तव्य

लातूर, दि. ०१ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली. जनसंपर्क कार्यक्रमाला परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उदगीरचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे क्रीडा व युवक कल्याण व बंदर विकास मंत्री संजय बनसोडे उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत आहोत,असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.तसेच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असून यामध्ये डॉ. अफसर शेख व नाझेर काझी हे उत्तम काम करत आहेत असा पुनरुच्चार त्यांनी केला. आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. उदगीर हे भारताचे सार प्रतिबिंबित करते आणि आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

या भागातील विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींचे आम्ही उद्घाटन केले आहे. उदगीरला कृषी वस्तू व्यापार केंद्र म्हणूनही मान्यता आहे. मंत्री संजय बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले की, जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या कामावर खूश आहोत असे यावेळी पवार म्हणाले. संजय बनसोडे यांना मतदान करण्याची विनंती अजित पवार यांनी उपस्थित जनतेला केली. उदगीरच्या सांस्कृतिक वारसाबद्दल बोलताना ते म्हणाले, उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला असून प्राचीन काळापासून तो आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखला जातो. लातूर विमानतळाच्या विकासासाठी नाइट लँडिंग सुविधेसह सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.