अगोदर पोराशी निपटा… बापाचा विषय तुमच्या बसचा नाही; ठाकरे गटाने महायुतीला डिवचलं

0
3

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. युवासेनेच्या उमेदेवारांनी अभाविपला व्हाईट वॉश दिला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत या विजयाबद्दल आभारा मानले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे तसेच अयोध्या पौळ यांनीही पोस्ट शेअर करत विरोधकांना डिवचलंय. ‘अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! ‘असे म्हणत या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ पुन्हा एकदा 10 पैकी 10 जागा. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांना आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना, सर्वांना खूप धन्यवाद. तुम्ही दाखवलेला विश्वास, पाठिंबा, घेतलेली मेहनत आणि आशीर्वाद याबद्दल आभारी आहे. आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर आमचा परफॉर्मनस्ही लक्षणीयरित्या सुधारला. इथूनच विजयाची सुरूवात होत्ये! ‘ असे लिहीत आदित्य ठाकरेंनी सर्वांचे आभार मानले.

सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ट्विट केलं आहे. ‘ अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यानो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. ‘नरेटिव्ह.. नरेटिव्ह..’ अशी खरमरीत टीका दानवे यांनी केली.

तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनीही ‘एक्स’ वर एक व्हिडीओ शेअर करत विरोधकांना चांगलंच फटकारलंय. ‘ बाप को हात लगानेसे पहले बेटेसे तो निपटले… आज सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेच्या 10 पैकी 10 जागा निवडून आल्यात, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि भाजप, गद्दार टोळी या सगळ्यांच्या पोटात ( पराभवामुळे) दुखत असेल तर त्यासाठी एखादं औषध घेऊन टाका. हा ( सिनेट निवडणुकांचा निकाल ) तर पक्त ट्रेलर होता, विधानसभेच्या 288 जागांचा, खासकरून गद्दारांच्या जागेवर जो निकाल लागेल, तो पिक्चर महाराष्ट्र अजून पाहणार आहे ‘ अशा शब्दांत अयोध्या पौल यांनी शिंदे गट, भाजपला चांगलच डिवचलंय.