पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
85

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला मुका मार लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड मध्ये पोलीस अटक करतील अशी भीती दाखवून एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केलेला आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर टीम राजस्थान मधील जयपूर येथे रवाना झाली होती. मयांक गोयल हा अटक असून त्याच्या मदतीने अक्षत गोयलचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. तो राजस्थानमधील जयपूर येथे असल्याची माहिती मयांककडून पोलिसांना मिळाली. सापळा रचून आरोपी अक्षत गोयलला पकडण्यासाठी सायबर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. अक्षत हा त्याच्या इतर मित्रांसह काळ्या चारचाकी गाडीत बसला होता.

पोलिसांनी त्या गाडीला घेरून अक्षत आणि त्याच्या मित्रांना खाली उतरण्यास सांगितले. परंतु, थेट गाडी सुरू करून अक्षतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्यासाठी गाडीपुढे थांबलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर गाडी घालून अक्षत पळून गेला. घटनेनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात स्वामी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अक्षतवर गुन्हा दाखल केला आहे.