मुंबई, दि. 27 (पीसीबी) : शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पण त्यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खुद्द फडणवीसांनीच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या प्रतिक्रियेचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी चित्रपटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लोकांना फारसं माहिती नसलेलं आयुष्यही समोर आल्याचं म्हटलं. “आज धर्मवीर २ च स्क्रीनिंग सुरू झालं आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर १ हा चित्रपट आपण पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर २’ आला पाहिजे. ‘धर्मवीर १’ लोकांनी डोक्यावर घेतला. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मलाही उत्कंठा, काही गोष्टी पाहिल्या आहेत, काही…”
“हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहेत”, असं ते म्हणाले.