धक्कादायक । डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली; २ जागीच जणांचा मृत्यू

0
87

कल्याण, दि.२६ (पीसीबी) : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका काही ठिकाणी बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये कांबा म्हारळगाव वरप जवळील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या डोंगर खोदकामात आज एक दुर्दैवी घटना घडली. डोंगरात स्फोटकांचा वापर करून खाणकाम चालू असताना अचानक वीज पडली. त्यामुळे आपोआप स्फोटके फुटली. या स्फोटात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्फोटाच्या घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन युवक जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांपैकी एक तरुण मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. त्याचे नाव राजन असल्याचे कळते. त्याचे वय 25 ते 26 वर्षे असल्याचा अंदाज आहे. तर दुसरा मृत व्यक्ती झारखंडचा रहिवासी आहेय त्याचे वय देखील सुमारे 25 ते 26 असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही मृत तरुणांना आणि जखमीना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या दुर्घटनेने या भागातील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतही जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. तसेच रस्ते मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जोगेश्वरीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जोगेश्वरीत एक महिला मॅनहोलमध्ये पडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांकडून महिलेचा शोध सुरु आहे.