मुसळधार पाऊसामुळे मुंबई-पुणे-ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर; ‘या’ भागात रेड अलर्ट

0
68

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : महाराष्ट्रात सध्या सर्वच भागात मुसळधार पाऊस होत आहे. काल रात्री ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. अति मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं होतं. रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे रेल्वे उशीराने धावत होत्या. प्रवाशांचे हाल झाले. आता आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर आणि ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यातही पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. पुणे- पिंपरी चिंचवडमधील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

मुंबई शहरात रात्री मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून महिलेचा शोधायला सुरुवात केली. विमल अप्पाशा गायकवाड महिलेचं नाव आहे. कामावरून घरी येताना मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी- पुढचे दोन दिवस कोकणात पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले आहे. त्या क्षेत्राचे ट्रफ उत्तर कोकण किनारपट्टीवर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊसधारा सुरु आहेत. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 3488 मिलिमिटर पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे. पुढचे दोन दिवस पावसाचे असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात असणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. काल मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे सभेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचाचा पर्याय आहे. पावसाने व्यत्यय आला तर पर्यायी व्यवस्था होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी व्यवस्था केली आहे.