महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याला भर रस्त्यात मारहाण

0
64

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मीटर निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शास्त्री गार्डन पिंपरी कॅम्प येथे घडली.

विनोद ताठे (रा. पिंपरी) असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, विनोद ताठे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मीटर निरीक्षक पदावर काम करतात. त्यांचे कार्यालय पिंपरी कॅम्प येथे शनी मंदिराजवळ आहे. मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजताच्या सुमारास ते घरातून त्यांच्या दुचाकीवरून कार्यालयात जाण्यासाठी निघाले. पिंपरी कॅम्प परिसरातील शास्त्री गार्डन जवळ आल्यानंतर दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

मला का मारताय, अशी विचारणा ताठे यांनी आरोपींकडे केली. मात्र त्यांना काहीही उत्तर न देता आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली. बेदम मारहाण केल्यानंतर आरोपी शास्त्री गार्डन जवळील पहिल्या गल्लीतून पळून गेले.

या घटनेत विनोद ताठे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच उजव्या पायाला आणि हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे.