कर्मचाऱ्यांकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा अपहार

0
4

बालाजी सोसायटी शिक्षण संस्थेतील प्रकार

वाकड, दि. 25 (पीसीबी) : ताथवडे येथील बालाजी सोसायटी शिक्षण संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या नावाच्या कोऱ्या धनादेशाद्वारे संस्थेच्या खात्यातून तब्बल तीन कोटी रुपये काढून घेत पैशांचा अपहार केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 ऑक्टोबर 2019 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत घडला.

याप्रकरणी मंगळवारी (दि. 24) वाकड पोलीस ठाण्यात परमानंदन बालासुब्रमनियन (वय 48 रा.कल्याणी नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परनधामन बालासूब्रमनियन (वय 51, रा. कल्याणी नगर, पुणे), निखिल नटवर अग्रवाल (वय 34, रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून श्री बालाजी सोसायटी शैक्षणिक संस्थेच्या खात्यामध्ये असलेल्या रकमेचा अपहार केला. यासाठी आरोपींनी चालू खात्याचे कोरे धनादेश मागून घेतले. त्याद्वारे विविध कारणे देत बँक खात्यातून दोन कोटी 99 लाख 41 हजार 524 रुपये काढून घेतले. संबंधित निधीचा आस्थापनेसाठी कोणताही उपयोग न करता पैशांचा गैरवापर केला. ही बाब उघडकीस येतात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.