पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रदर्शनीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

0
4

पुणे, दि. 24 (पीसीबी) : घरगुती किंवा गृहनिर्माण सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे प्रतिकिलोवॅट सुमारे १२० युनिट मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या रास्तापेठ येथील प्रदर्शनीला मंगळवारी (दि. २४) दिवसभर नागरिकांचा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

महावितरण, केंद्र शासनाचे ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ (आरईसी) व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनच्या (मास्मा) सहकार्याने रास्तापेठ येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ‘आरईसी’च्या मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती (मुंबई), अधीक्षक अभियंते अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अनिल घोगरे, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, समीर गांधी, जयेश अकोले आदींची उपस्थिती होती.

पीएम सूर्यघर योजनेत अर्ज सादर करण्यापासून ते छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करेपर्यंतच्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र स्टॉल लावण्यात आला होता. यात योजनेचे फायदे, सहभागासाठी वेबसाईटवर अर्ज सादर करणे, एजंसीची निवड करणे, छतावर सौर संच बसविणे, मीटरींग आदींचे प्रात्यक्षिकांसह नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. तसेच योजनेची माहितीपत्रके वितरीत करण्यात आले. ‘पीएम सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी महावितरणकडून आयोजित राज्यातील ही पहिली प्रदर्शनी आहे. या प्रदर्शनीमुळे वीजग्राहकांशी योजनेबाबत होणार थेट संवाद कौतुकास्पद आहे’ असे मत मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती सरस्वती यांनी व्यक्त केले. या प्रदर्शनीचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी काम पाहिले.

घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे आदींसह योजनेची विविध माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.