मुंबई, दि. 24 (पीसीबी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पावित्रा घेतला आहे. या पुतळ्याचे बांधकाम करणारा जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांचे निविदा (Tender) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
राजकोट किल्ला या ठिकाणी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवभक्तांच्या तीव्र भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात उमटल्या होत्या. शिवपुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याची टीका अनेकांनी केली होती. यानंतर राज्य शासनाच्या वतीने शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याचा रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी साधारण 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ६० फुटांचा असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र सोमवार (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण पाहायला मिळत आहे.