दोन्ही हातात बेड्या असताना…. एन्काऊंटर की हत्या; सुषमा अंधारेचा सरकारला सवाल

0
69

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हे एन्काऊंटर होतं की हत्या असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे. अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता, असा आरोप त्यांनी केला. ‘ पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? ज्या पिस्तूलाने अक्षयने गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेलं पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकतो?’ याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

बलात्काराचा आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहेत, मात्र विरोधकांना यात काळबेरं दिसतंय. त्याच मुद्यावरूनही सुषमा अंधारे यांनी या भाष्य केलंय. काही लोकं मला विचारत आहेत की तो तर गेला, तुम्ही का त्यावर आक्षेप घेताय ? असं सांगताना त्यांनी संजय शिरसाट यांच्या विधानाचा दाखला दिला. एकनाथ शिंदे यांच्या (शिवसेना) पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केल्याचे अंधारे यांनी नमूद केलं . ‘ पोलिसांना त्यांचं काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे’ अशी मागणीही शिरसाट यांनी केली. त्यामुळे याप्रकरणी फक्त आम्ही, एखाद्या व्यक्तीनेच संशय व्यक्त केलेल नाही, असे अंधारे यांनी नमूद केले.

अक्षय शिंदेच्या मृत्यूबद्दल संशय वाटण्याचे,आक्षेप का घ्यावासा वाटतो याचं आणखी एक कारण अंधारे यांनी स्पष्ट केलं. हैदाराबमधील तेलंगमणध्ये एन्काऊंटर झालं,तेदेखील बलात्काराच्या केसमधील आरोपी होते. त्या केसमधील चारही आरोपींना क्राईम सीन व्हिजीटसाठी नेण्यात येत होतं. बदलापूर केसमधील आरोपी अक्षय शिंदे यालाही तळाजो येथून बदलापूर येथे घेऊन जात असतानाच ही घटना घडली. दोन्ही घटनांमध्ये क्राईम सीन व्हिजीटदरम्यानच एन्काऊंटर होतो, सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव दोन्ही केसमध्ये केला गेला, असं सांगत त्यांनी या एन्काऊंटरवर संशय व्यक्त केला.

अक्षय शिंदे हा गतीमंद आहे असं बदलापूर पोलिसांनी आधी सांगितलं होतं. जर तो गतीमंद होता, तर तो एवढा हिंस्त्र, चालाख, काही सेकंदात पिस्तुल ओढून घेण्याइतका,चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा झाला, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अक्षय शिंदे याला संपवाल्याने हे प्रकरण संपत नाही. याप्रकरणातून कोणालातरी वाचवलं जातं आहे. ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, ही फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे.या प्रकरणाची न्यायधिषांच्या समिती कडून चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. एस आय टी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं, अशी टाकाही त्यांनी केली.