मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 30 दुचाकी जप्त

0
3

निगडी, दि.२३ (पीसीबी) : मौजमजेसाठी दुचाकी चोरी करून त्‍याची विक्री करणार्‍या दोन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून चोरीच्‍या 30 दुचाकी हस्‍तगत केल्‍या आहेत. या कारवाईमुळे 15 पोलीस ठाण्यातील 27 गुन्हे उघडकीस आले आहेत. राम ऊर्फ कविराज ज्ञानोबा केंद्रे (वय 28) आणि अविनाश तुकाराम होळंबे (वय 20, दोघेही रा. मु. खोकलेवाडी, पो. सुपा, ता. गंगाखेड, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्‍यातील एका वाहन चोरीच्‍या गुन्‍ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख यांनी 300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्या नंतर गुन्हा केलेल्या दोन संशयीत आरोपीं बद्दल माहिती मिळवली.

निगडी पोलीस ठाण्‍यातील अंमलदार दत्ता शिंदे, सुनील पवार, प्रविण बांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आरोपी राम केंद्रे आणि त्‍याचा साथीदार अविनाश होळंबे यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडे केलेल्‍या तपासात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्‍या दोघांनी मिळून 15 दुचाकी चोरून नेण्यासाठी चिखली परीसरात एका पडीक जागेत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. तसेच काही दुचाकी त्यांच्‍या मुळगावी विक्री केल्याचेही सांगितले. पोलिसांनी चोरीची वाहने विक्री केलेल्या दोन एंजटला ताब्यात घेऊन त्यांच्‍याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्‍या. आरोपींना अटक झाल्याची बातमी त्यांचे मुळगाव परिसरात कळाल्याने अनेक लोकांनी विकत घेतलेल्या चोरीच्या 10 दुचाकी आरोपींच्या घराबाहेर बेवारस आणून सोडल्या.

डुप्लीकेट चावीने उघडायचे कुलूप

दोन्ही आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते काही काळ चिखली परीसरात वास्तव्यास होते. दरम्यान त्यांच्याकडे असलेली डुप्लीकेट चावी ज्या मोटार सायकलला बसेल ती मोटार सायकल चोरी करुन त्या गाड्या निर्जनस्थळी लाऊन मागणी प्रमाणे गावाकडे नेऊन विक्री करुन, पुन्हा पुण्यात येऊन फॅब्रिकेशनचे काम करत होते. तसेच गावी येताना जाताना लागणा-या भागातून सुध्दा ते मोटार सायकल चोरी करत असे.

निगडी (चार), चिखली (चार), हिंजवडी (चार), पिंपरी (दोन), वाकड (दोन), आळंदी (एक), दिघी (एक), चर्तुश्रृंगी (एक), रांजणगाव एमआयडीसी (एक), रांजणगाव (एक), हवेली (एक), लातूर शिवाजीनगर (दोन), बीड-अंबाजोगाई (एक), मिरारोड (एक), खालापुर (एक) अशा एकूण 15 पोलीस ठाण्यातील 27 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, सह आयुक्‍त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी उपायुक्‍त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्‍त मुकुटलाल पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी, निलेश वाघमारे सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार भगवान नागरगोजे, राहुल गायकवाड, सुधाकर अवताडे, सिद्राम बाबा, विनोद होणमाने, दत्तात्रय शिंदे, स्वप्नील पाचपांडे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, दिपक पिसे, प्रविण बांबळे, केशव चेपटे, नतुन कोंडे यांच्‍या पथकाने केली आहे