मेळघाटजवळ बसचा भीषण अपघात; 50 प्रवाशांसहित बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली

0
4

मेळघाट, दि. २३ (पीसीबी) : अमरावती येथील अतिदुर्गम अशा मेळघाटाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. सेमाडोह जवळ खाजगी प्रवासी बस पुलावरून खाली कोसळली आणि या अपघातात 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सेमाडोहजवळ एका वळणावर खासगी बसचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला. या अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून श्तानिकांनी आणि बचावपथकाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढत उपचारांसाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. या बस मध्ये सर्वाधिक शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावरच हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी बस अमरावती येथून धारणीच्या दिशेने निघाली होती. साडेआठच्या सुमारास सेमाडोह नजीकच्या परिसरात धोक्याच्या वळणावरून जाताना बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून धाडकन खाली कोसळली. यावेळी बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यातील अनेक जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आले असून त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात येत आहेत.

अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. स्थानिक रहिवाशांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आणि जखमींना प्राथमिक उपचारांसाठी पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचे कारण शोधत तपास सुरू केला. अमरावतीच्या मेळघाट परिसरात जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असते. मात्र वाहतूक पोलिसांचं जीवघेण्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होतं. या ठिकाणी अनेक रस्ते आड वळणाचे आहेत, जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन या मार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना प्रशासनाने करावी अशी मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे. योग्य सूचना फलक लावावेत आणि रस्त्याची व्यवस्थित देखभाल करावी अशी मागणी देखील करण्यात येते.