“पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, पडळकर आणि भुजबळांनाही निवडणुकीत इंगा दाखवू”

0
4

वडीगोद्री, दि. २३ (पीसीबी) : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेलं असतानाच ओबीसी समाजही आंदोलन करत आहे. ओबीसी समाजातील काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. जालन्यातील वडीगोद्रीत हे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा पाचवा दिवस असूनही प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे ओबीसी नेत्यांनीही या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ या ओबीसी नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने समाज आक्रमक झाला आहे. दोन दिवसात हे ओबीसी नेते आंदोलनाच्या ठिकाणी आले नाही तर त्यांना निवडणुकीत इंगा दाखवू, असा इशाराच या समाज बांधवांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना समर्थन म्हणून गेवराई येथून ओबीसी समाज बांधवांनी मोटरसायकल रॅली काढली होती. सुरुवातीला सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ओबीसी आंदोलकांनी आंदोलन स्थळापर्यंत रॅली काढली. यावेळी शरद पवार यांच्यासह सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चक्काजाम करणाऱ्यांना पांगवले. यावेळी या आंदोलकांनी ओबीसी नेत्यांवरच आपला रोष व्यक्त केला. दोन दिवसात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ आंदोलनाकडे आले नाही तर त्यांना निवडणुकीत इंगा दाखवू, असा इशाराच या आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि याच उपोषणाला भेट देण्यासाठी आता दिवसेंदिवस गर्दी वाढताना पाहायला मिळतेय. परिसरातील महिलांनी समर्थन म्हणून आज रॅली काढत उपोषण स्थळी येत पाठिंबा दिलाय. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण कोण देईल हे अद्याप माहीत नाही. ही अंधारातली गोष्ट आहे. त्यामुळे धनगर समाज बांधवांनी एसटीची लढाई लढलीच पाहिजे त्याच सोबत ओबीसी आरक्षण देखील वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. मनोज जरांगे हे सलाईन लावून उपोषण करत आहेत. असलं उपोषण मी कधीच पाहिलं नाही. सरकार जरांगेच्या तालावर नाचत आहे. जरांगे तुमच्यासाठी आम्ही हा रस्ता मोकळाच ठेवला होता. तुमचे चेलेचपाटे तुमच्या सांगण्यावरून येथे येऊन शिवीगाळ करतात. अर्वाच्य हावभाव करतात. गाडी फास्ट घेऊन येतात. आम्ही आणखीन बांगड्या भरूनच बसायचं का? तुम्हाला रस्ता पाहिजे असेल तर गप्प आणि गुमान इथून जायचं होतं, असं हाके म्हणाले.