“धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू”

0
4

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी दिला आहे. लहामटे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत असून मुंबईला जाणारे रस्ते थांबवणार, रेल्वेचे रूळ उखडून काढू असा इशारादेखील लहामटे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह असून राज्यात काय पडसाद उमटतात याकडे लक्ष लागलं आहे.

जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ ,अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्तापर्यंत आदिवासांनी एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी दिला.

मुळात धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातील निर्णय हा केंद्राचा आहे. धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केली आहे त्यामुळे सरकारने असं करू नये, ते पाऊल उचललं तर आम्ही दाखवून देऊ असंही लहामटे यांनी ठणकावलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचा दावा महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याने केला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी अजित पवार महायुतीतून बाहेर पडावेत यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावरही लहामटे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अजित पवार यांना महायुती मधून कोणीच बाहेर काढू शकत नाही’असा दावा त्यांनी केला. ‘महायुती कडून विकासकामांचा पाढा लावण्यात आला आहे.आणि अमचा पक्ष हा शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांचा आहे’ असे त्यांनी नमूद केलं.

दरम्यान धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची तिसरी बैठक आज होणार आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव सौ विनिता सिंगल यांच्या दालनामध्ये आज (23 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीस मा. आ प्रकाश आण्णा शेंडगे,आमदार गोपीचंद पडळकर, पांडूरंग मेरगळ व इतर सदस्य,संबंधित विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. पहिल्या बैठकीत सादर केलेले कायदेशीर व घटनात्मक पुरावे यांचा आधार घेऊन S.T आरक्षण अमलबजावणी साठी कसा उपयोग होईल याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होईल.