सुलभा उबाळे, विलास लांडे यांची चुप्पी कशासाठी ?

0
9

भोसरी, दि. २१ (पीसीबी) : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जवळपास नव्हे तर १०१ टक्का निश्चित आहे. आता महायुतीच्या अशा तगड्या उमेदवाराला पाडायचे तर त्याच तोडिचे नाव पाहिजेत म्हणून काही नावे पुढे आली होती. अजित पवार यांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणे यांनी दादांची राष्ट्रवादी सोडून साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि प्रचाराला दणक्यात सुरवात केली. गव्हाणे यांचा काका माजी आमदार विलास लांडे हे दादांच्या पक्षात असताना तेसुध्दा महाविकास आघाडीतून इच्छुक होते. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांचे नाव सर्वात आक्रमक आणि आमदार लांडगे यांच्या आरे ला कारे कऱणाऱ्या म्हणून चर्चेत होते. भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तेसुध्दा स्पर्धेत आले.

सर्व राजकीय घडामोडीत अजित गव्हाणे आणि रवी लांडगे यांच्यापैकी आमदार महेश लांडगे यांचे प्रतिस्पर्धी असतील अशी चर्चा रंगली. माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने त्यांचेही नाव मागे पडले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्याचे आश्वासन अजितदादांनी त्यांना दिले आणि थांबून ठेवले. परिषदेवर आमदारकी मिळाली नाही तरी पंढरपूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपद हा दुसरा पर्याय लांडगे यांनी समोर ठेवला आणि आता त्या पदाचीच ते वाट पहात बसले. परिणामी भोसरी विधानसभेसाठी ते नसणार असे सर्वांनी गृहित धरले आणि त्यांच्या नावावर फूली पडली. शिवसेनेच्या रणरागिनी सुलभा उबाळे यांनी दोन वेळा भोसरी लढवली. सुरवातीला अवघ्या १२०० मतांनी विलास लांडे यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या. नंतर २०१४ मध्ये मोठ्या फरकाने पराभव झाला. आता पुन्हा आपल्याल संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. महेश लांडगे यांच्या विरोधात रवी लांडगे किंवा अजित गव्हाणे यांच्यापेक्षा आक्रम पध्दतीने तोडिस तोड उत्तर मीच देऊ शकते, असेही त्या सांगतात. आमदार लांडगे आणि भाजप विरोधात प्रचंड नाराजी असल्याने त्याचा फायदा होईल असाही त्यांचा दावा आहे. महाआघाडीत रवी लांडगे किंवा अजित गव्हाणे यांच्यापेक्षा आक्रमक प्रचार करून भाजपचा पराभव करेल, असा आत्मविश्वास त्यांना आहे. प्रत्यक्षात सुलभा उबाळे यासुध्दा विलास लांडे यांच्या प्रमाणे मौन धारण करून आहेत. उबाळे आणि लांडे यांच्या मौनात आणखी काही गूढ आहे का याचा शोध सर्व नेते घेत आहेत.