कर्नाटकातील विद्यार्थ्यांची पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना भेट

0
103

अत्याधुनिक शहरी विकास आणि स्मार्ट सिटी उपक्रमांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : कर्नाटकातील बागलकोट येथील बी.व्ही.व्ही.एस. पॉलिटेक्निक च्या तिसऱ्या वर्षाच्या सिव्हिल इंजिनियरिंग विद्यार्थ्यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांना भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक शहरी विकास आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना प्रत्यक्ष पाहणी केली. शैक्षणिक वर्षातील अभ्यास दौ-याचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौ-यात प्राध्यापक गिरीष मल्लीकटटी, सचिन बावलटटी, सविता सोबारड, सौजन्या कटटी यांच्यासह ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यादरम्यान, विद्यार्थ्यांना विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील एबीडी एरियातील ८ टू ८० पार्क, लिनिअर गार्डन, रस्ते विकास, सायकल मार्ग, योगा पार्क तसेच, निगडी येथील आयसीसीसी मधून स्मार्ट वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन उपाय, सीसीटीव्ही प्रकल्प, पाणी व्यवस्थापन, स्मार्ट सारथी मोबाईल ऍप, पार्किग, पर्यावरण सेन्सर आदी प्रकल्पांची माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीचे उपअभियंता राहूल पाटील, कनिष्ठ अभियंता अक्षय इथापे, सौरभ जगताप, सल्लागार प्रतिनिधी श्रीकृष्ण हिंगमिरे, महेश खांडगे, हरप्रीत कपूर, संकेत पाटील, बिनीश सुरेंद्रन, आशिष चिकणे यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प निहाय माहिती दिली.

शहरांचे नियोजन, अंमलबजावणी आणि आव्हाने यांच्याबद्दल माहिती जाणून घेतांना विद्यार्थ्यांना या प्रकल्पांच्या तज्ञांसोबत आणि अभियंत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि स्मार्ट सिटी संकल्पनेबद्दल आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना शहरी नियोजन आणि शाश्वत विकासाचे अधिक चांगले ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांना अधिक स्मार्ट शहरे निर्माण करण्यात योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळाल्याची प्रतिक्रीया श्री. मल्लीकटटी यांनी व्यक्त केली.