जळगाव, दि. २० (पीसीबी) : “कुणाचं नाव वापरायचं हा मला कायद्याने दिलेला अधिकार आहे. अहो, रूपालीताई मला अभिमान आहे की, मी अशा वडिलांच्या पोटी जन्माला आली, की ज्यांचं नाव मी अभिमानाने सांगू शकते. ताई नावालाही कर्तृत्वान वडील लागतात याचा मला अभिमान आहे” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केलाय. “तुम्ही जळगावत आलात, फक्त रोहिणी खडसेंचा जप न करता महिला अत्याचाराच्या घटनेकडे लक्ष घाला. राजकारण करण्यासाठी महिला आयोगाचे पद तुमच्याकडे दिलेलं नाही” असं रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांना सुनावलं.
“महिलांना न्याय देण्यासाठी हे पद तुम्हाला दिलं आहे. जळगावात आल्यापासून तुम्हाला खडसेंशिवाय दुसरं काही दिसत नाही का? तुम्हाला खडसे नावाचा फोबिया झालाय. ज्या कामासाठी तुम्हाला महिला आयोगाचे पद दिले त्यालाच न्याय द्या” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. ‘राजकारण करायला आयुष्य पडलंय भेटूया पुन्हा’ असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
रूपाली चाकणकर यांनी काल रोहिणी खडसे यांच्यावर जबरी टीका केली होती. “नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरल्याशिवाय यांना कोणी ओळखते का? तसच वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्य किंमत देतो” अशी टीका केली होती. त्याला दुसऱ्यांदा रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.










































