राजकीय भूकंप ! भाजपला मोठा धक्का, भाजप नेत्याचा मेव्हणाच काँग्रेसच्या गळाला

0
94

नांदेड, दि. २० (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळताच काँग्रेसला अच्छे दिन सुरू झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढली आहे. एवढेच नव्हे तर सोडून गेलेल्यांचीही आता काँग्रेसमध्ये घरवापसी होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेडमधील काँग्रेसचे एक बलाढ्य नेते आपल्या सूनेसह काँग्रेसमध्ये आज प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जाईल. भाजपच नव्हे तर भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

भाजपचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगांवकर हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन घरवापसी करणार आहेत. विशेष म्हणजे खतगांवकर यांच्या सून मीनल खतगांवकर या सुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी हा प्रवेश सोहळा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. खतगांवकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ त्यांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव खतगांवकर आणि सूनबाई मीनल खतगावकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. नांदेड काँग्रेसच्या हातून जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांनी भाजपला मात देत विजय खेचून आणला होता. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा करिश्मा राहिला नसल्याचं सांगितलं जात होतं.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मीनल खतगांवकर यांनी भाजपकडून नांदेड लोकसभेची मागणी केली होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मीनल खतगांवकर या प्रचंड नाराज झाल्या होत्या. मीनल यांनी पक्षाविरोधात उघड उघड भूमिका घेतली होती. मी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असं मीनल यांनी जाहीर केलं होतं.

याच दरम्यान, मीनल यांनी मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, जरांगे यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मीनल खतगांवकर कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता त्यावर पडदा पडला आहे. भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांची सून मीनल हे दोघेही आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे दोन्ही नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मीनल या नायगाव विधानसभेवर दावा करू शकतात, अशी शक्यता आहे. खतगांवकर कुटुंबीयांसोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली.