महायुतीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा रस्सीखेच , शिंदे आक्रमक

0
65


मुंबई, दि. १९ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्यावेळी जागावाटपाच्या चर्चेत बॅकफूटवर गेलेली शिंदेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीआधी मात्र फ्रंटफूटवर खेळताना दिसत आहे. लोकसभेला भाजपपेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखल्यानं शिंदेसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांनी जागावाटपाच्या चर्चेत अधिकाधिक जागांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेवेळी भाजपनं वापरलेला पॅटर्न आता शिंदेसेना वापरु लागली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

भाजप गेल्या विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या जागांइतक्याच जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत १६४ जागा लढवल्या आहेत. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या गोटातून मोठी माहिती समोर येत आहे. शिंदेसेना १२६ ते १२८ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. शिंदेसेनेची पूर्वतयारी झालेली आहे. जागावाटपात त्यांच्याकडून किमान ११२ जागांचा आग्रह धरला जाईल. शिंदेसेनेनं या जागांसाठी निरीक्षकदेखील नेमले होते.

भाजपनं मागील निवडणुकीत १६४ जागा लढवल्या. महायुतीतील मोठा भाऊ आताही तितक्याच जागांसाठी आग्रही आहे. तर शिंदेसेनेनंही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत १२६ ते १२८ जागांवर तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी पक्ष एकसंध होता. सध्याच्या घडीला शिंदेंसोबत सेनेचे ४० आमदार आहेत. आता पक्ष किमान ११२ जागांसाठी आग्रही असल्याचं कळतं. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. भाजप सुरुवातीला ४८ पैकी ३२ ते ३५ जागांसाठी आग्रही होता. शिंदेसेनेला १० पेक्षा कमी जागा मिळतील असं बोललं जात होतं. पण जागावाटपात शिंदेंनी महत्प्रयासानं १५ जागा पदरात पाडून घेतल्या. शिंदेंना वाटाघाटीत बराच घाम गाळावा लागला. पण १५ पैकी ७ जागा त्यांनी निवडून आणल्या. तर भाजपला २८ जागा लढवून केवळ ९ जागा मिळाल्या. शिंदेसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा लढवूनही भाजपला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही