राजकीय खळबळ । राज्यात तिसरी आघाडी; छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी आणि ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

0
8

पुणे, दि. १९ (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्व पक्ष हे निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. त्यातच आता महायुती आणि महाविकासआघाडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर वारंवार बैठका होत आहेत. आजही पुण्यात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक सूचक व्यक्त केले.

राजू शेट्टी यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’वर एक मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांना तिसऱ्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “तिसरी आघाडी या शब्दाला आमचा आक्षेप आहे. ते दोघे पहिले, दुसरे आणि आम्ही तिसरे असं का? गेल्या पाच वर्षात ते दोघेही आलटून पालटूनही अडीच सत्तेवर होते. या काळात पूर्ण महाराष्ट्राची वाट लावून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना पहिले आणि दुसरे का म्हणायचं, असा आमचा आक्षेप आहे”, असे राजू शेट्टी म्हणाले.

“पण आम्ही एक व्यापक आणि आश्वासक अशी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या तरी आम्ही फक्त प्रयत्नच करत आहोत. त्याला निश्चित असं स्वरुप आलेलं नाही. सुरुवातीला आम्ही शेतकरी चळवळीतील सर्व नेत्यांना एकत्र करुन बैठक घेतली. यानंतर आमच्यासोबत सैनिकही आले. सध्या आम्ही प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या सर्वांची पार्श्वभूमी ही चळवळ आहे”,असे सूचक विधान राजू शेट्टी यांनी केले.

“आम्ही एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर काही मुद्दे सोडावावे लागतील. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावलेत हे आम्ही पाहिलं आहे. आम्ही निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी एकत्र येत आहोत. आम्हाला चुलत्या- पुतण्याच्या वादात पडायचं नाही. चिमूटभर आणि मूठभर सांगायचं त्याचा कमी अधिक फटका माझ्यासहित सगळ्यांना बसतो”, असेही राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान आज पुण्यात छत्रपती संभाजीराजे , बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची एकत्रित बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि ओल्या दुष्काळाच्या केलेल्या पाहणीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन एकत्रित पाहणी केली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उमेदवार देण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे