‘निष्क्रिय’ राम वाकडकर यांचा राजीनामा व आरोप म्हणजे विधानसभा निवडणूकपूर्व भाजपच्या बदनामीचे सुनियोजित कटकारस्थान!

0
16

पिंपरी, दि. १९ (पीसीबी)-
पिंपरी चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पक्ष सदस्यत्व राजीनाम्याचे वृत्त काही न्यूजपोर्टलच्या माध्यमातून वाचनात आले. राजीनामा देताना त्यांनी भाजपवर तसेच जगताप कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करीत स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

भाजप पक्षात प्रवेश करताच राम वाकडकर यांना त्यावेळी पार पडलेली महापालिका निवडणुक लढविण्याची संधी पक्षाने दिली. त्यावेळी त्यांच्यासह भाजपच्या संपूर्ण पॅनलचा पराभव होऊनही दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी वाकडकर यांना पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी संधी दिली. मात्र तरीही वाकडकर हे पक्षाच्या कोणत्याही बैठकीस किंवा कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत की त्यांनी प्रदेशाकडून आलेला पक्षाचा कोणताही कार्यक्रम त्यांच्या वाकड प्रभागात राबविला नाही. त्यांच्या प्रभागातील बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख ही रचनाही कधी पूर्ण केली नाही. असे असतानाही पक्षाने त्यांना कधीच डावलले नाही. मग त्यांच्यासोबत गटबाजी झाली अथवा अन्याय झाला असे कसे म्हणता येईल?

वाकडकर यांनी पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला मात्र राजनीतीनुसार दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती अश्विनीताई जगताप यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. त्यामुळे येथे घराणेशाहीचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट पोटनिवडणुकीत आपण पक्षाचे काम केल्याचा कांगावा करणाऱ्या वाकडकर यांच्याच प्रभागातून अश्विनीताई पिछाडीवर होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाचे काम केल्याचा दावाही खोटा आहे.

ज्या जगताप कुटुंबाने वेळोवेळी वाकडकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अनेकदा पक्षाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली. त्याच जगताप कुटुंबावर केलेला मनमानी कारभाराचा आरोप हा तर निव्वळ थोतांड आहे. याउलट राम वाकडकर यांनीच मनमानी कारभार करून वाकडमधील भाजप कार्यकर्त्याना कधीही ताकद दिली नाही.

प्रभागातील रस्त्यांच्या समस्यांबाबत त्यांनी केलेले आरोप हे त्यांच्याच कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. ज्या समस्या सोडविण्याची वल्गना करून त्यांनी महापालिका निवडणूक लढविली होती. संबंधित रस्त्याची निविदा निघूनही रस्त्याला जागा मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कोणतेही प्रयत्न केले नाहीत, ही वस्तुस्थिती सर्वांनाच माहीत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षाकडून देण्यात आलेल्या प्रलोभनांमुळे राम वाकडकर यांना त्या पक्षात जायचे असल्यानेच त्यांनी त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठीच आमदार अश्विनीताई जगताप आणि भारतीय जनता पक्षाच्या बदनामीसाठी हा खटाटोप चालविला आहे. मात्र शहरातील भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षाचा मतदार या खोट्या अपप्रचाराला कदापी थारा देणार नाही.

स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी वाकडकर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून शहर भाजप हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारत आहे.