अजित गव्हाणेंकडून वसंत बोराटेंच्या कामाचे तोंड भरून कौतुक; स्वराज्य सोसायटीतील गणेश मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन
दि. १९ (पीसीबी) भोसरी:- मोशी, बोराटेवस्ती येथील स्वराज्य हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तब्बल 605 सदनिकाधारक या पाणीटंचाईने वैतागले होते. या प्रश्नाला मार्गी लावण्याचा ”विडा” माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी उचलला होता. प्रशासकीय संघर्ष पार पाडत अखेर स्वराज्य सोसायटीमध्ये नागरिकांच्या हक्काचे पाणी अक्षरशः खेचून आणले. त्यांच्या या प्रयत्नांचे तोंड भरून कौतुक माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. तर अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून प्रश्न मार्गी लागल्याची भावना बोराटे यांनी व्यक्त केली. मोशी, बोराटेवस्ती येथील स्वराज्य हाऊसिंग
सोसायटीतील स्वराज्य गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, युवा नेते विशाल आहेर, विशाल जाधव, राहुल आहेर, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, रुपाली आल्हाट, श्री. पोखरकर, श्री.कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे यावेळी म्हणाले, स्वराज्य सोसायटीमध्ये 605 सदनिकाधारक आहेत. या सोसायटीला गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर तसेच नियमित पाणीपुरवठा होत नव्हता. रोजच्याच पाणी टंचाईमुळे येथील नागरिक वैतागलेले होते. सोसायटीतील पदाधिकारी, मुख्य म्हणजे माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी माझ्याशी या समस्येबाबत चर्चा केली. प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न कसा हाताळता येईल? काय उपाययोजना केल्या पाहिजेत? जेणेकरून नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल. अशी चर्चा वसंत बोराटे यांच्याशी करण्यात आली. या चर्चेतून मार्ग निघाला. अखेर स्वराज्य हाउसिंग सोसायटीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे पाणी वसंत बोराटे यांच्या प्रयत्नाने मिळाले. वसंत बोराटे यांच्या कामाची पद्धत म्हणजे ‘तात्काळ ॲक्शन’ अशी आहे. त्यांना या भागातील रहिवासी कोणत्याही मूलभूत सुविधेपासून वंचित राहिले नाही पाहिजे अशी आहे. ही सोसायटीच नाही तर या भागात त्यांचे काम खूप चांगले आहे. वसंत बोराटे कधीच एखादी गोष्ट सांगत नसतात तर त्यांना ते काम करायचेच असते. योग्य ठिकाणी योग्य ते काम करण्याची त्यांची खासियत आहे.
गव्हाणे यांच्या पुढाकारातून प्रश्न मार्गी – बोराटे
वसंत बोराटे यावेळी म्हणाले स्वराज्य हाउसिंग सोसायटीतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडवून मला नागरिकांना दिलासा द्यायचा होता. यासाठी वेळोवेळी गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून या समस्येवर मार्ग निघाला. आज येथील 605 रहिवाशांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिले आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या मंदिराला सभामंडप बांधण्याचे काम देखील आता सुरू होणार आहे. यामध्ये अजित गव्हाणे यांनी दाखवलेला सकारात्मक विश्वास, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रशासकीय कामावरील हातोटीचा अनुभव आम्ही सर्वांनीच घेतला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना यापुढे असाच ”मार्गदर्शक” आणि दुसऱ्याच्या कामाचेही कौतुक करणारा नेता हवा आहे.