मुंबई, दि. १९ (पीसीबी) : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता महायुतीत कोणत्या पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील महत्त्वाच्या पाच जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 जागा मिळणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने 60 पेक्षा जास्त जागा हव्यात असा दावा केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील पाच जागा आम्हाला द्या, अशी मागणी केली आहे. मराठवाड्यात दावा केलेल्या या मतदारसंघावर अजित पवार गटातील एकही आमदार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील पाथरी, जालना शहर, घनसांवागी, गंगापूर, उसमानाबाद-कळंब या मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाने दावा केलेल्या मतदारसंघांवर त्यांचा विद्यमान एकही आमदार नाही. यातील दोन जागांवर काँग्रेस, एका जागेवर शरद पवार गट, एका जागेवर भाजप आणि एका जागेवर ठाकरे गटाचे आमदार आहेत.
या 5 मतदार संघातील विद्यमान आमदार
पाथरी – सुरेश वरपुडकर (काँग्रेस) जालना शहर – कैलास गोरट्याल (काँग्रेस) घनसांवागी – राजेश टोपे (NCP SP) गंगापूर – प्रशांत बंब (भाजप) उसमानाबाद-कळंब – कैलास पाटील (ठाकरे गट)
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवला
तर दुसरीकडे महायुतीतील 170 ते 175 विधानसभा जागांवरील तिढा सुटल्याचे बोललं जात आहे. तर उर्वरित जागांवर अमित शाहांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २४ आणि २५ तारखेला महायुतीमधील समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवला जाणार आहे. तसेच यात निवडणूक रणनीतीही आखली जाणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला सुनील तटकरे, प्रसाद लाड, उदय सामंत, प्रविण दरेकर हे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.