अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

0
102

– महाआघाडीतील घटक पक्षांशी जुळवून घेणार

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१८) अजित पवार यांनी पक्षीय बैठक बोलावली आहे. जागावाटपावरून असलेली रस्सीखेच आणि बंडखोरीची शक्यता याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर अजित पवार आपल्या सर्व आमदारांना एकत्रित करून महायुतीमध्ये काम करण्याबाबत तसेच घटक पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घेण्याबाबत सूचना देणार आहेत. यावेळी महामंडळ वाटप याबाबत देखील चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी आहे. त्यामुळे आजची बैठक विधानसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत नाराजी या अनुषंगाने महत्त्वाची आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारही पक्षातील नेत्यांना सूचना देणार आहेत. “महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत. महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी”, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या होत्या.