एखाद्या मंत्र्यासाठी गर्दी होत नाही तेव्हढी गर्दी माझ्यासाठी होते – सुजय विखे पाटील

0
64

संगमनेर, दि. १७ (पीसीबी) : आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी त्यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता. सुजय विखे पाटलांचा पराभव भाजपवर नामुष्की ओढावली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्येही सुजय विखे पाटलांनी इच्छा व्यक्त केलीये. राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे नागरी सत्कारादरम्यान सुजय विखे बोलत होते. या सत्कार सोहळ्यावेळी विखेंनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर टीका केली.

संगमनेरमध्ये एकही चारी करायला कुणी जेसीबी देत नाही. मी मागच्या आवर्तनाला गेलो तर फ्लेक्स बोर्डवर शेजारच्या आमदाराचा एक हात वरती असलेला फोटो होता, जलनायक म्हणून…दुसऱ्या आवर्तनाला गेलो तर दोन हात वरती असलेला फोटो होता. तिसऱ्या आवर्तनात काय वरती करतील मला माहीत नाही. आता आपल्याला तिसऱ्या फ्लेक्स बोर्डची वाट पहावी लागेल. धरणात जाऊन जलपूजन करतात मात्र चारी खंदायला एक जेसीबी देऊ शकत नाही असं म्हणत सुजय विखेंनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

मागच्या विधानसभेत जो निकाल होता त्यापेक्षा जास्त मताधिक्य राधाकृष्ण विखे पाटलांना सुजय विखे मिळवून देणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेले काम आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचे आहे. आपले व्यक्तिगत हेवेदावे आणि संघर्ष बाजूला ठेवा. जे लोक आज भाषण करताय ते पाच वर्षे तुम्हाला दिसणार नाही. आम्हीच सातत्याने तुमच्या सोबत असतो. विधानसभा लागण्यापूर्वी शिर्डी विधानसभेत सगळ्यांना दहावे, मयती, लग्न, गणपती आठवतात. निवडणुकीत पडल्यानंतर परत कुणी दिसत नाही. मी पडलो मात्र दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो. तुमचा विश्वास आमच्या परिवारावर कायम ठेवा, असं आवाहनही सुजय विखेंनी केलं.

आपल्या मतदारसंघात जात – धर्म नाही तर माणूस म्हणून काम केली जातात. इथे कुणीही जात-धर्माच्या नावावर विष कालवण्याचा प्रयत्न केला तर मला त्याच्यावर कारवाई करावी लागेल. ती कारवाई काय असेल ते माईकवर बोलण्याचा विषय नाही. काही लोक महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताय? हे योग्य नाही. जात – धर्म आड आला तर माझ्यासारखा माणूस विकास करूनही पराभूत होतो. विकास नसेल तर राजकारण करण्याची माझी इच्छा नाही. लोकसभेत जे गलिच्छ वातावरण झालं त्यामुळे माझ्यासारखा काम करणारा व्यक्ती पराभूत झाला. चांगला माणूस हारला तर त्या भागातील पुढची 10 वर्षे आणि पुढची पिढी अंधारात जाते. चांगला माणूस हारला तर त्या भागातील पुढची 10 वर्षे आणि पुढची पिढी अंधारात जाते. पराभवाने मला काही फरक पडला नाही. एखाद्या मंत्र्यासाठी जेव्हढी गर्दी होत नाही तेव्हढी गर्दी आजही माझ्यासाठी होते, असंही सुजय विखे पाटील म्हणाले.