माजी नगरसेवक संदीप कस्पटेंचा भाजपचा राजीनामा, भाजपमध्ये गळती सुरू,

0
134

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील सुंदोपसुंदी उफाळून आली आहे. चिंचवड विधानसभेत शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर १५ नगरसेवक पक्षातून बाहेर पडणार असा इशारा देण्यात आला होता, त्याचाच पहिला अंक आज पार पडला. वाकड प्रभागात ज्यांनी भाजपचे प्रस्थ वाढवले, त्या अत्यंत दमदार अशा माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्र पाठवत त्यांनी भाजपला रामराम केला आहे. अशा प्रकारे आणखी १५-१६ माजी रथीमहारथी नगरसवेक भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.

वाकडमध्ये २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीत भाजपचे चार सदस्यांचे पॅनल विजयी केले. आरती चोंधे, ममता गायकवाड, तुषार कामठे हे त्यांच्या पॅनलमध्ये विजयी झाले होते. कामठे यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आणि आता ते त्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. पाठोपाठ संदीप कस्पटे यांनी भाजप सोडल्याने वाकड, रहाटणी, काळेवाडी पट्यात भाजपला मोठा फटका बसणार आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, रहाटणी-काळेवाडीचे चंद्रकांत नखाते यांनीही भाजप सोडल्यात जमा आहे.
मी आजच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे माझा राजीनामा पाठविली आहे. शहराध्यक्षांच्या कारभाराला वैतागुन मी राजीनामा देत असल्याचे त्यात म्हटले आहे. अशा प्रकारे राजीनामा देणार असल्याचे आम्ही वारंवार नेत्यांना सांगितले होते, पण त्यांनी गांभीर्याने घेतले नाही असे संदीप कस्पटे यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधीला सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकित पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांना उमेदवारी दिली तर आम्ही १४-१५ नगरसवेक पक्ष सोडणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह सर्वांनी पत्रकार परिषदेत दिला होता.