पोलीस भरती संस्थाचालकाकडून १६ वर्षीय मुलीचा विनयभंग; राजगुरुनगर येथील प्रकार

0
30

दि. 15 (पीसीबी) राजगुरुनगर : राजगुरुनगर येथील गव्हाणे करिअर अकॅडमी या पोलिस, सनदी अधिकारी परीक्षापूर्व प्रशिक्षण केंद्रात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी अकॅडमीचालक वामन सुरेश गव्हाणे याला खेड पोलिसांनी पॉक्सो अर्थात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत अटक केली आहे. राज्यभर बाललैंगिक अत्याचारांच्या घटना आणि त्यावरून जनतेत प्रक्षोभानंतर तीव्र स्वरूपाची आंदोलने होत असताना राजगुरुनगर शहरातील या घटनेनेमोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका क्रीडा संकुल येथे या अकॅडमीचे कार्यालय आहे. येथे पोलिस, शासकीय नोकर भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. युवक, युवतींसाठी येथे प्रशिक्षण, शारीरिक प्रशिक्षण घेण्यासाठी वास्तव्याची सोय आहे. परजिल्ह्यातून आलेली अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ गेल्या मे महिन्यात येथे आले आहेत. बुधवारी (दि. ११) संध्याकाळी इतर प्रशिक्षित मुलींबरोबर असताना पीडित मुलीला तिच्या आईचा फोन आला आहे, असे सांगून चालक गव्हाणे याने कार्यालयात बोलावून घेतले.
ती आत आल्यावर फी जमा झाली नसल्याचे कारण सांगून स्वतःचा मोबाईल पाहायला सांगितले. मुलीने मोबाईल हातात घेऊन पाहायला सुरू करताच कार्यालयाचे दार आतून बंद करून गव्हाणे याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी एक प्रशिक्षणार्थी मुलगा कार्यालयाकडे त्याच्या कामासाठी धावत आला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असं फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीने घडलेल्या प्रकारची माहिती एका सहकारी मुलीला तसेच मोबाईलवरून आईला सांगितली. त्यानंतर शुक्रवारी (दि. १३) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे करत आहेत.