बजाज आलियान्झ कंपनी व्यवस्थापकाने घातला १ कोटी ४७ लाखाचा गंडा

0
30

पुणे, दि. 14 (पीसीबी) : बजाज आलियान्झ कंपनीला त्यांच्याच व्यवस्थापकाने तब्बल १ कोटी ४७ लाख ८२ हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. अनिवासी भारतीय नागरिकांच्या ‘अनक्लेम्ड पॉलिसी’ची माहिती चोरण्यात आली. त्यानंतर, बनावट नावाने बँक खाते तयार करून मोबाईल क्रमांक बदलण्यात आले. त्यानंतर, या पॉलिसीची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करून घेण्यात आली. फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही घटना २६ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान घडली आहे.

मनोज जैन (रा. बिर्लानगर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बलराम कुमार पटवा (वय ३२, रा. मानपुरा पटवा टोली, जि. गया, बिहार) यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज आलियान्झ लाईफ इन्शोरन्स कंपनीमार्फत अनिवासी भारतीय नागरिकांना जीवन विमा दिला जातो. असेच एक अनिवासी भारतीय नागरिक असलेल्या कन्हैया चटलानी यांनी ‘बजाज आलियान्झ’कडे तक्रार केली होती. त्यांच्या वडिलांनी २०११ मध्ये एक पॉलिसी काढली होती. या पॉलिसीच्या मॅच्युरिटी रकमेबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी ‘पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर ९१ लाख ३ हजार १८२ रुपये पाठविण्यात आल्याचे त्यांना ‘बजाज आलियान्झ’ कडून सांगण्यात आले. मात्र उत्तर प्रदेश येथे आपले कोणतेही बँक खाते नसल्याचे तसेच आपल्याला कुठलीही रक्कम मिळाली नसल्याचे चटलानी यांनी त्यांना सांगितले.

या प्रकरणामध्ये संशय वाटल्याने कंपनीने तपास सुरू केला. कंपनीच्या लाईफ पोर्टलवर याबाबत तपासणी करण्यात आली. तेव्हा लॉग इन करून पॉलिसी काढताना नोंदवण्यात आलेला मोबाईल क्रमांक बदलण्यात आलेला होता. त्या जागी दुसरा क्रमांक समाविष्ट केल्याचे दिसून आले.

तसेच, बँक खात्याचे तपशीलसुद्धा बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या अंतर्गत तपासामध्ये व्यवस्थापक मनोज जैन यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले. त्याने कंपनीच्या लॅपटॉपचा वापर करून चटलानी यांच्या विमा पॉलिसीमध्ये १९ ऑक्टोबर २०२० पासून ७३ वेळा लॉग इन केल्याचे दिसून आले. त्यानंतर, जैन याने अन्य पॉलिसीधारकांचे लॉग इन केले आहे का याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी तीन पॉलिसीधारकांचे पैसे अन्य ठिकाणी पाठविण्याचे समोर आले आहे. हे सर्व विमाधारक अनिवासी भारतीय असून जैन याने कंपनीची १ कोटी ४७ लाख ८२ हजार २७ रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच, याने पाच जणांच्या पॉलिसीमध्ये आरोपीने फेरफार केल्याचे देखील समोर आले.