हिंजवडी, वाकड, आळंदी, चाकण मधून आठ पिस्तूल, 16 काडतुसे जप्त

0
48

चिंचवड, दि. 13 (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिटतीन, चार आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने हिंजवडी, वाकड, आळंदी आणि चाकण परिसरात वेगवेगळ्या कारवाया करत आठ पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या पाच कारवयांमध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट चारने कारवाई केली. अनिल दत्तात्रय नखाते (वय 30, रा. मोरेवस्ती चिखली) याला अटक करून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. 11) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास भुजबळ वस्ती हिंजवडी येथे केली.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी येथे गुंडा विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 12) कारवाई केली. विशाल उर्फ मन्या भिमराव कांबळे (वय 21, रा. कैलास नगर, थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी वडगाव रोडवर गुरुवारी (दि. 12) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. दर्शन शिवाजी खैरनार (वय 25, रा. शिक्रापूर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली खुर्द येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय 28, रा. आपटी, ता. शिरूर), सुरज अशोक शिवले (वय 24, रा. आपटी, ता. शिरूर), मुकेश दरबार मुझालदे (वय 26, रा. वडू खुर्द, ता. शिरूर), पवन दत्तात्रय शेजवळ (वय 35, रा. नारायणगाव पुणे) कमलेश उर्फ डॅनी महादेव कानडे (वय 29, रा. मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 12 लाख रुपये किमतीची कार, एक लाख 50 हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल, 7000 रुपये किमतीचे सात जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण ते रोहकल रोडवर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई करत अंकित शंकर ठाकूर (वय 18, रा. खराबवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.