अरविंद केजरीवाल संध्याकाळपर्यंत तिहार जेलमधून सुटणार

0
22

नवी दिल्ली, दि. १३ – दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज (१३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत तिहार जेलमधून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी सूचिबद्ध केली होती. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.